शरद पवार मराठा की ओबीसी?, शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल; काय लिहिलंय त्यात?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फेक सर्टिफिकेट असून त्यावरून शरद पवार हे मराठा की ओबीसी अशी चर्चा रंगली आहे. शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. पवार समर्थक विकास पासलकर यांनी शरद पवार यांच्या दाखल्याची मूळ प्रत दाखवून टीकाकारांचे तोंड बंद केलं आहे.
प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 12 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जोरदार आंदोलने सुरू आहेत. दोन्ही समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भूमिका मांडली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यावर सर्वच राजकीय पक्षांचं एकमत आहे. मात्र, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वेगळ्याच प्रकारे ट्रोल केलं जात आहे. काहींच्या मते शरद पवार हे ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या मागे आहेत. तर काहींच्या मते मराठा आंदोलनाचे सूत्रधार शरद पवार हेच आहेत. हा आरोप सुरू असतानाच शरद पवार यांच्या शाळेचा दाखला व्हायरल केला जात आहे. त्यावर पवारांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल होत आहे. त्यावर शरद पवार यांची जात मराठा नोंदवण्यात आली आहे. पण शरद पवार यांनी ओबीसींचं सर्टिफेकट घेतल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत होता. त्यामुळे शरद पवार हे ओबीसी झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, शरद पवार यांचे समर्थक विकास पासलकर यांनी पवार यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी ओबीसींचं सर्टिफिकेट घेतलं नसल्याचा दावाही विकास पासलकर यांनी केला आहे.
काय म्हणाले पासलकर?
शरद पवारांचं बारामतीत शिक्षण झालं आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातं. या षडयंत्रकारी लोकांना कोणी तरी रसद पुरवते. हा षडयंत्राचा भाग आहे. कित्येक वर्षापासून हे सुरू आहे. सामाजिक विषय येतो तेव्हा खोलात जाऊन शोधावं लागतं. त्यामुळे पवार साहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर काय लिहिलंय ते तुम्हीच पाहा. हा घ्या पुरावा. पवार मराठा असल्याचा हा धडधडती पुरावा आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांला बदनाम करण्याचं व्हिटॅमिन कुठून येतं? नागपूर सेंटरकडूनच हे व्हिटॅमिन पुरवलं जातंय, असा आरोप विकास पासलकर यांनी केला आहे.
तो निव्वळ बालिशपणा
दरम्यान, शरद पवार यांच्या दाखल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही दाखल्यावरचं नाव बघितल का? खोटी सर्टिफिकेट मिळणं ही आता मोठी गोष्ट राहिली नाही. मार्केटमध्ये सर्रास अशी सर्टिफिकेटं मिळतात. शरद पवार यांच्यावरील आरोप हा निव्वळ बालिशपणा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.