वय वगैरे सब झूठ… शरद पवार आहेत ते… आजारी असूनही दौऱ्यावर जाणार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल तब्येत बिघडली होती. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. शिवाय सर्दी आणि थकवाही होता. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, शरद पवार यांनी आजारपण बाजूला टाकत आज सकाळीच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बारामतीतील गोविंद बागेत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती | 12 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल तब्येत बिघडली होती. त्यांना सर्दी झाली होती. थकवा जाणवत होता. तसेच अस्वस्थही वाटत होतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शरद पवार हे दिवाळीत कुणालाच भेटणार नसल्याचा अंदाज होता. पण ते शरद पवार आहेत. वयाच्या 82व्या वर्षीही आजारपण बाजूला सारून त्यांनी सकाळीच गोविंद बागेत आपला दरबार भरवला. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता तर शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावरही जाणार आहेत.
शरद पवारांची आज पुन्हा एकदा डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला. शरद पवार बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांना काल अस्वस्थपणा जाणवला होता. थकवा आणि सर्दीही होती. त्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे पहाटेच उठून कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
अजित पवार समर्थक पवारांना भेटले
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि अजित पवारांचे समर्थक केशव जगताप हे सुद्धा शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला गोविंद बागेत आले होते. यावेळी शरद पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामाची चौकशी केली. तसेच ऊस गाळपाची माहितीही घेतली. या भेटीनंतर केशव जगताप यांनी मीडियाशी संवाद साधला. शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र राहावं, अशी इच्छा केशव जगताप यांनी व्यक्त केली. राजकारणात ते एकत्र आहेत की नाही माहीत नाही. पण दोन्ही नेत्यांनी एकत्र असलं पाहिजे, असं ते म्हणाले.
सोलापूर दौऱ्यावर जाणार
शरद पवार यांचा 16 नोव्हेंबर रोजी सोलापूरचा दौरा होता. या दौऱ्यात ते सोलापूर शहर, पंढरपूर आणि माढ्यात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. पण तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी दौऱ्यात बदल केला आहे. मात्र, आजारी असले तरी शरद पवार माढ्यातील कापसेवाडी तेथील नियोजित शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. हेलिकॉप्टरने शरद पवार मेळाव्याला जाणार आहेत. मात्र, सोलापूर शहरातील सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला आणि पंढरपूर येथील मेळाव्याला पवार जाणार नाहीत.
आता प्रकृती ठिक
शरद पवार यांच्या आजारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवारसाहेब काल जरा आजारी होते. पण आता त्यांची प्रकृती ठिक आहे. तुम्हीही त्यांना भेटला आहात. तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. जनता हीच त्यांचं टॉनिक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
गोविंद बागेतच भेटतील
शरद पवारांनी दोन दिवस प्रवास टाळावा. ते घरात ते भेटू शकतात. त्यामुळे त्यांचे काही कार्यक्रम रद्द केले आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दोन दिवस ते गोविंद बागेतच सर्वांना भेटतील, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.