पवार गटाकडून सुप्रिया सुळेंचे नव्हे तर या नवीन नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स
Sharad Pawar and jayant patil | शरद पवार यांचे गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री...असे लिहून या शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया सुळे ऐवजी दुसऱ्याच नेत्याचे नाव या बॅनर्सवर आले आहे.
प्रदीप कापसे, पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2024 | पुणेरी पाट्यांप्रमाणे पुणे शहरातील बॅनर नेहमी चर्चेचा विषय असतो. पुणे शहरात लागलेल्या या बॅनरची चर्चा राज्यभर होत असते. मग राजकीय बॅनर असतील तर त्यासंदर्भात अधिकच कुतूहल तयार झालेले असते. पुणे शहरात आता शरद पवार यांच्या गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शरद पवार यांचे गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री…असे लिहून या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी जयंत पाटील यांना भावी मुख्यमंत्री म्हटले गेले आहे.
भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेते स्पर्धेत
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांना भावी मुख्यमंत्री करत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुणे शहरातील सातारा रस्त्यावर बॅनर्स लावले आहेत. त्यात जयंत पाटील यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून घेतले आहे.
काय आहे बॅनर्समध्ये
पुण्यात जयंत पाटील यांचे बॅनर लागले आहे. जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख केला आहे. जयंत पाटील, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो बॅनर्सवर आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी विकास चव्हाण यांनी हे बॅनर्स लावले आहे.
राज्यात ठिकठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यावेळी आपआपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी भावी मुख्यमंत्री करण्याची स्पर्धा लागली असते. विधानसभा निवडणुक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. तरीही आतापासून नेत्यांचे कार्यकर्ते भावी मुख्यमंत्रीपदाची चर्चा करत आहे. या बॅनर्समुळे चर्चा मात्र होत असते.