राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले
निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक आहे. आम्ही त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. एका अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष काढून घेतला आहे. पवार साहेबांनी कुठलाही पक्ष घेतला नाही, तर स्वतः पक्ष काढला आहे.
मुंबई, दि. 14 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली. त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. तसेच आजची बैठक कशासाठी होती? हे सांगितले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चाबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. मंगलदास बांदल यांनी ही बातमी दिल्याचे त्यांना सांगितले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मंगलदास बांदल यांच्यावर पक्षाची कोणती जबाबदारी आहे? मला जयंत पाटील यांना विचारावे लागणार आहे. परंतु कोणत्या राष्ट्रवादी संदर्भात हा विषय आहे. कारण सध्या दोन राष्ट्रवादी आहेत ना? मला याबाबत काही माहीत नाही, असे त्यांनी सांगत हात झटकले.
कोणती चिन्ह मागितली
राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांची नावे दिली आहे. कपबशी, वडाचे झाड अन् शिट्टी या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक आहे. आम्ही त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. एका अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष काढून घेतला आहे. पवार साहेबांनी कुठलाही पक्ष घेतला नाही, तर स्वतः पक्ष काढला आहे. यामुळे आयोगाचा निर्णय आम्हाला अयोग्य आणि चुकीचा वाटला आहे.
आम्ही मविआ म्हणून लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मविआच्या पुढच्या नियोजनाबाबत होती. तिन्ही पक्षांच्या वतीने कोण बोलणार? याच नियोजन करण्यात आले. महायुती सरकारवर सुप्रिया सुळे यांनी घणाघाती हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, सध्याचे सरकार असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यामुळे दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकरी आक्रमक कधी होतात, जेव्हा अन्याय होतो. सरकारने अमानुषपणे अन्याय केला आहे. सरकार कष्ट करणाऱ्यांवर अन्याय करत आहे. अनेक अडचणी साखर कारखान्यांबाबत निर्माण झाल्या आहेत. परंतु हे प्रश्न खोके सरकार सोडवू शकत नाही.
आक्षणावरुन जरांगे पाटील यांच्यावर अन्याय होत आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजावर अन्याय झाला आहे. हे सरकार कोणाला न्याय देऊ शकले नाही.