कांद्याने पुन्हा केला वांधा, पुणे जिल्ह्यात भावात घसरण, काय आहे कारण?
onion and tomato price : कांदा आणि टोमॅटो ही पिके शेतकरी आणि ग्राहकांना रडवणारी पिके आहेत. कधी मालास भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकावे लागते तर कधी दर वधारल्यामुळे किचनमधून त्याचा वापर कमी होतो.
पुणे | 19 ऑगस्ट 2023 : देशात गेल्या महिन्यात टोमॅटोची चर्चा होती. कधी नव्हे इतका दर टोमॅटोला मिळाला होता. यामुळे देशातील काही भागात रेशन दुकानातून टोमॅटोची विक्री झाली. आता टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. त्याचवेळी कांदा वधारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक सुरु केली होती. परंतु शनिवारी कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर बाजार समितीत कांद्याच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
कांद्याच्या दरात का झाली घसरण
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूक सुरु केली होती. साठवणूक केलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारात आणला. बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने ४० ते ५० टक्क्याने भाव कोसळले आहे. शनिवारी मंचर बाजार समितीत ४२ हजार पिशव्यांची आवक झाली. मालाची जास्त आवक झाल्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा दर ३० ते ३२ रुपये प्रतिकिलो होतो तो १७ ते २२ रुपयांपर्यंत आला. भावात घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
लासलगावमध्ये काय आहेत दर
राज्यात नाशिक जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे मोठे व्यवहार होतात. या ठिकाणी कांद्याचे दर स्थिर आहेत. प्रतिक्विंटल सरासरी दर 2250 रुपये आहे. परंतु पुण्यात दर घसरल्यामुळे नाशिकमध्ये दर घसण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
अनुदान मिळणार- सत्तार
राज्यात कांद्याला प्रती क्विंटल 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटलपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, हे अनुदान अनेक ठिकाणी मिळाले नाही. यासंदर्भात बोलताना पणन मंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांना अनुदान लवकरच मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी वित्त विभागाने पणन विभागाला 465 कोटी 99 लाख रुपये निधी दिला आहे. तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. अनुदानासाठी 30 लाख 36 हजार 476 कांदा उत्पादक शेतकरी पात्र ठरले आहेत.