शरद पवार यांची भेट होताच पंकजा मुंडे यांचा सरकारला अंतिम इशारा; काय आहे कारण?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची आज भेट झाली. पुण्यात या दोन्ही नेत्यांची तासभर भेट झाली. या भेटीत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ आणि ऊसतोड कामगारांबाबत चर्चा झाली. तसेच महामंडळाच्या कामकाजावरही नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी सरकारला अंतिम इशाराही दिला.
विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 जानेवारी 2023 : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावर ही भेट होती. यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाबाबतही या भेटीत चर्चा झाली. ही भेट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्याच सरकारला अंतिम इशाराही दिला आहे. पंकजा यांनी थेट आंदोलन करण्याचाच इशारा दिला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंकजा मुंडे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मी सरकारला अंतिम इशारा देणार आहे. निर्वाणीचा इशारा देणार आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाबाबत इशारा देणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तर आंदोलन करू
आम्हाला आंदोलन करावे लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये. तशी परिस्थिती निर्माण झाली तर आंदेलनही करू. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामावर ऊसतोडणी कामगार असमाधानी आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
पवार नाराज, मीही नाराज
34 टक्के दर वाढ देण्याचे साखर संघाने मान्य केले आहे. मुकादमांना एक टक्का दरवाढ देणार आहेत. ऊसतोड कामगारांबाबत शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा लवाद वर्षानुवर्षे निर्णय घ्यायचा. ती पंरपरा कायम आहे. व्यस्त शेड्यूलमधून शरद पवार यांनी वेळ दिला. त्याबद्दल पवार साहेबांचे विशेष आभार. गोपीनाथ मुंडे महामंडळाची फक्त स्थापना झाली. पण पुढे काहीच काम झाले नाही. यावर पवार साहेब देखील नाराज आहे. मी पण नाराज आहे, असंही त्या म्हणाल्या.
मी खूश आहे…
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आव्हाड यांच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. मंदिर होत आहे. त्याचं लोकार्पण होणार आहे. कोरोडो लोकांची इच्छा पूर्ण होत आहे. यातच मी खूश आहे, असंही त्या म्हणाल्या.