मुहूर्त साधला… पुणे आणि ठाणेकरांची पसंत एकच; दोन्ही शहरात दसऱ्याच्या मुहूर्तावर कशाची खरेदी?
राज्यभरात काल दसरा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी या दिवसाचा मुहूर्त साधत खरेदी करण्यावर भर दिला. कुणी सोने खरेदी केले, कुणी घर तर कुणी वाहन खरेदी करून उत्सव साजरा केला.
पुणे | 25 ऑक्टोबर 2023 : दसऱ्याच्या दिवशी खरेदी करणं नेहमी शुभ मानलं जातं. त्यामुळे काल दसऱ्याच्या निमित्ताने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. कुणी घराचं बुकींग केलं, कुणी सोने खरेदी केलं, कुणी चांदी घेतली तर कुणी वाहने खरेदी करण्यावर भर दिला. खरेदी करताना अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेकांनी सपत्नीक खरेदी करण्यावर भर दिला. राज्यभरात बाजारामध्ये खरेदीची लगबग दिसत होती. पुणे, ठाणे असो की जळगाव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा पुणेकरांनी 9 हजार 974 वाहनांची खरेदी केली. यात 5 हजार 578 दुचाकी तर 2 हजार 910 चारचाकींचा समावेश आहे. या शिवाय 669 ई-वाहनांची देखील पुणेकरांनी खरेदी केली आहे. गेल्यावर्षी 27 नोव्हेंबर ते 4 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 9 हजार 812 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा वाहन खरेदी किंचित वाढ झाल्याचं प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
ठाणेकरांचीही तिच पसंत
पुणेकरांप्रमाणेच ठाणेकरांनीही वाहन खरेदीलाच प्राधान्य दिलं. नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून दसऱ्यापर्यंत यंदा ठाण्यात 4118 नवीन वाहनांचे नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते दसऱ्याच्या मुहूर्तावर 3612 वाहनांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ठाण्यात वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. एकूण वाहन खरेदी वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत चारचाकी वाहनांच्या नोंदणीत यंदा घट झाली आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहनमध्ये नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत 4 हजार 118 नवीन वाहनांची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 2638 दुचाकींचा समावेश आहे. त्यापाठोपाठ 865 चारचाकी, 325 व्यावसायिक ( गुड्स कॅरिअर ) तर 116 रिक्षांचा समावेश आहे.
आमदार काळेंची बुलेट स्वारी
दसरा दिवाळीच्या काळात नागरिकांनी स्थानिक बाजार पेठेतून खरेदी करावी म्हणून कोपरगावचे अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत मंगल कार्यालय येथे बैठक घेतली. यावेळी काळे यांनी व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. तसेच शहरातील बाजारपेठ कशी फुलेल याबाबत त्यांच्या सूचनाही ऐकल्या.
बैठकीनंतर आमदार आशुतोष काळे यांनी बुलेटला किक मारली. यावेळी बुलेटवर त्यांची पत्नी चैताली काळेही बसल्या होत्या. काळे पतीपत्नींनी थेट बुलेट स्वारी करत बाजारपेठ गाठली आणि स्थानिक दुकानदारांकडून विविध वस्तू खरेदी केल्या.
जळगावकरांनी लुटलं सोनं
दरम्यान, काल दसऱ्याचं निमित्त साधून जळगावकरांनी सोनं लुटलं. सुवर्णनगरी असलेल्या जळगावमध्ये काल सोने खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड झुंबड उडाली होती. सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांनी वाढ झाल्यानंतरही मुहूर्त साधण्याकरता ग्राहकांची सकाळपासूनच सोने बाजारात गर्दी केली होती.
57 हजार रुपयांपर्यंत सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र गेल्या 15 दिवसानंतर सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचे भाव हे 61 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना ग्राहकांचे बजेट कोलमडले.