राहुल हंडोरे याच्यावरच संशय का बळावला?, ‘ती’ एक चूक भोवली अन्… दर्शना पवार हत्याकांडात नेमकं काय घडलं?
दर्शना पवार हिची तिचाच मित्र राहुल हंडोरे याने हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर राहुलच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याने हत्येची कबुलीही दिली आहे.
पुणे : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिची हत्या झाल्यानंतर तिचा मारेकरी राहुल हंडोरे याला अटक केली आहे. दर्शनाने लग्न करण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात तिची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. ट्रेकिंगच्या नावाने राजगडावर नेऊन तिथेच तिच्याशी लग्नासाठी तगादा लावला. वादावादी झाल्यानंतर त्याच ठिकाणी दर्शनाची दगडाने ठेचून हत्या केल्याचं राहुलने म्हटलं आहे. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी आता पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर, राहुलला आमच्या हाती द्या, आम्ही त्याला शिक्षा करू, असं दर्शनाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
दर्शना दत्तू पवार ही 26 वर्षीय तरुणी गायब झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनीही तक्रार घेत तात्काळ चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. राजगडाच्या आजूबाजूला तपास केला असता मृतदेहाच्या काही अंतरावर दर्शनाची सँडल, काळा चष्मा आणि बंद पडलेला मोबाईल पोलिसांना सापडला. त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवल्यावर तिची हत्या झाल्याचं उघड झालं.
एक चूक भोवली
दर्शनाची हत्या करणाऱ्या राहुलने एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तो ट्रेकिंगसाठी दर्शनाला घेऊन गेला होता. दर्शनाला बाईकवर घेऊन तो गेला होता. हीच चूक त्याला नडली. पोलिसांनी जेव्हा दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला तेव्हा दर्शना इथे कशी आली? असा सवाल पोलिसांना पडला. त्यानंतर पोलिसांनी राजगडाकडे येणारे जेवढे रस्ते होते, तिथले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी दर्शना आणि राहुल बाईकवरून जाताना पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी राहुलचा शोध घेण्यास सुरुवात केली. राहुलच्या घराला कुलूप होतं. तो फरार झाल्याचं लक्षात आल्यावर त्यानेच दर्शनाचा खून केल्याचा पोलिसांचा संशय बळावला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आला.
महाराष्ट्राच्या बाहेर फरार
दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल महाराष्ट्राच्या बाहेर फरार झाला होता. तो पश्चिम बंगाल, दिल्ली, चंदीगड आणि गोवा आदी टिकाणी गेला. त्यानंतर तो मुंबईत आला. अंधेरी परिसरात तो होता. पोलिसांनी या काळात त्याच्या कुटुंबीयांची मदत घेतली आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरी येण्याचं भावनिक आवाहन केलं. पोलिसांनी राहुलचा नंबर ट्रेस केला आणि त्याला अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक केली. त्यानंतर राहुल याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.