Modi Pune Visit : पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा आज कोणते मार्ग राहणार बंद
PM Narendra Modi Pune Visit: : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक मार्गात मोठा बदल केला गेला आहे.
पुणे |1 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. पुणे शहरातील वाहतुकीत बदल केला गेला आहे. तसेच काही शाळांना सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय पोलीस आणि पुणे पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. पंतप्रधान ज्या ज्या मार्गावरुन जाणार आहेत, त्या मार्गावर रंगीत तालीम घेतली गेलीय. विरोधकांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
असा आहे मोदी यांचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता पुणे विमानतळावर येणार आहे. सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. 11.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचे ते लोकार्पण करणार आहेत. शिवाजीनगरच्या ग्राऊंडवर नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
हे रस्ते असणार बंद
पुणे शहरातील प्रमुख मार्ग मोदी यांच्या दौऱ्यामुळे बंद राहणार आहे. पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, अलका चौक, टिळक रस्ता, जेधे चौक, संगमवाडी रोड , विमानतळ रोड दुपारी 3 पर्यंत बंद राहणार आहेत. या रस्त्यावरून प्रवास टाळा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
पुणे शहरातील शाळांना सुट्टी
पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे शहरातील ज्ञानप्रबोधनी, न्यू इंग्लिश स्कूल, अहिल्यादेवी हायस्कुल या शाळांना सुट्टी दिली गेली आहे. तसेच काही शाळांनी मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने वर्ग होणार आहे. नरेंद्र मोदी सकाळी ११ च्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहे. त्यावेळी त्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी काही अडचणी येऊ नये. म्हणून काही शाळांनी सुट्टी दिली आहे.