Gold Silver Price : गुढीपाडव्याला सोन्याची विक्रमी खरेदी होणार? पुणे अन् जळगावातील दर पाहिले का?
अमेरिकेतील दोन बँका दिवाळखोरीला निघाल्या आहेत. अमेरिकेतील या परिणामाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले आहे. यामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. पर्यायाने सोने, चांदी महागली आहे. गुढी पाडव्याला पुणे अन् जळगावात सोने चांदीला झळाळी आली.
पुणे, जळगाव : साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मग राज्यातील इतर शहरांप्रमाणे पुण्यात गुढीपाडवा निमित्त सोने खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचं दिसतंय. सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. पण त्यानंतर जळगाव आणि पुण्यात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सराफ बाजारात गर्दी होती. बुधवारी गुढी पाडव्यानिमित्त ही परिस्थिती कायम राहणार आहे. अमेरिकेत बँकींग क्षेत्राला बसलेल्या फटक्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारातही उमटत आहे. यामुळे सोने, चांदी महागली आहे.
काय आहे पुण्यात दर
गुढी पाडव्याला पुणे शहरात सोन्याचे दर चांगलेच वाढले आहे. हे दर आता 10 ग्रॅमसाठी 60 हजारांवर गेले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोने 1299 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. हा भाव 60 हजार रुपयांवर पोहचला. सोन्यासोबत चांदीनेही दरवाढीची सलामी दिली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी म्हणजे 12 मार्च रोजी सोन्याचे दर 56,890 होते ते आता 60 हजार झाले आहे. सात वर्षांपूर्वीचा विचार केल्यास पाडव्याला सोन्याचे दर 41,117 रुपये होते. म्हणजे सात वर्षांत त्यात तब्बल 19 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
सुर्वणनगरीत काय
जळगाव सुवर्णनगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होणार आहे. जळगावात सोन्याचे भाव विक्रमी 61 हजारांवर तर चांदीचे भाव 70 हजारांवर गेली आहे. सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ होऊनही गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांचा सोनं खरेदीचा कल असणार आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा विशेष कल असतो.
हॉलमार्क असणारे सोने घ्या
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. त्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागते.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.