मनोज जरांगे पाटील यांनी आता प्रतिष्ठा पणाला लावू नये; शिंदे सरकारमधील मंत्र्याचं वक्तव्य
Radhakrishna Vikhe Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलक आक्रमक, ठाणे बंदची हाक; शिंदे सरकार मधील मंत्र्याची प्रतिक्रिया चर्चेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही टीका, वाचा नेमकं काय म्हणाले...
पुणे | 11 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. आज तर त्यांनी उपचार घेण्यास आणि पाणी पिण्यासही नकार दिला आहे. सरकारकडून तीनवेळा चर्चा झाली. मात्र मागण्या पूर्ण होत नसल्याने जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. त्यांच्या या आंदोलनावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगेंनी आता प्रतिष्ठा पणाला लावू नये, असं ते म्हणालेत. आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. त्यानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील भीमाशंकरला गेले आहेत. तिथे त्यांनी दर्शन घेतलं. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काही मंडळींकडून आरक्षण हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा बनवला जातोय. मागच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं होतं. दुर्दैवाने मविआ सरकार यात कमी पडले. याचे परिणाम अख्ख्या राज्याला भोगावे लागत आहेत. आता आम्ही कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतलाय. मराठवाडा वगळता उर्वरित भागात आज ही मिळतंय. त्यामुळं मनोज जरांगे यांनी आता प्रतिष्ठा पणाला लावू नये, त्यानी थांबायला हवं. सरकारला संधी द्यावी, असं विखे पाटील म्हणालेत.
मंत्री गिरीश महाजन यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी परमनंट सोलुशन काढण्यासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला वेळ द्यावा, असं म्हटलं. सुरुवातीला त्यांची मागणी वेगळी होती. मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. कुणबी समाज वेगवेगळ्या भागात आहे. मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. आता ते मागणी करतायेत की, संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा. हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. हे अशक्य आहे. कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं, तर ते कोर्टात टिकणार नाही. पहिल्याच दिवशी ते फेटाळला जाईल त्यासाठी वेळ दिला पाहिजे, असं महाजन म्हणाले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगवला आहे. कांद्याच्या प्रश्नाबाबत आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत. आम्ही 2410 रुपयांनी खरेदी सुरू केली. असं कधीच झालं नव्हतं. आपल्या राज्यातील नेते केंद्रातील मंत्री शरद पवारांना उद्देशून होते. तेंव्हा त्यांच्याकडे कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वेळ नव्हता, असा टोला विखे पाटलांनी लगावला आहे.
श्रावणातील शेवटचा सोमवार होता. भीमाशंकर चरणी लीन होताना, राज्यावरील दुष्काळाचे संकट कायमस्वरूपी दूर होऊ दे. आमचं सरकारला जनतेच्या ईच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी, असं साकडं घातलं, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले.