पुणे चांदणी चौकातील पुलाचे काम कधी पूर्ण होणार? अखेर तारीख आली
pune chandni chowk bridge : पुणे येथील चांदणी चौकातील पूल कधी सुरु होणार? याची प्रतिक्षा पुणेकरांना लागली आहे. पुलाचे अनेक कामे अजून पूर्ण झालेली नाही. ही कामे कधी पूर्ण होणार? याची माहिती आता मिळाली आहे.
पुणे : पुणे शहरातील चांदणी चौक (Chandani chowk) पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्याकडे आले आहे. नवीन पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. हा नवीन पूल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा पुणेकर करत आहेत. या पुलामुळे पुणेकरांना आणखी एक वाहतुकीची चांगली सुविधा मिळणार आहे. सध्या चांदणी चौकातील पुलाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता आणखी काही कामे बाकी आहे. ती दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.
कधी होणार कामे पूर्ण
चांदणी चौक येथे एनडीए व बावधनला जोडणाऱ्या पुलासाठी ९३ गर्डर वापरले जात आहे. गर्डरचे हे काम सुमारे महिना भर चालणार आहे. पूल १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा आहे. हे काम सुरू असताना रस्त्यावरील वाहतूक प्रभावित होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंना रॅम्पचा वापर केला जाणार आहे. चांदणी चौक येथील एकूण कामांपैकी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ पुलाचे काम बाकी आहे. येत्या एक ते दीड महिन्यांत पूल बांधण्याचे काम पूर्ण होईल. तसेच फलक, भिंतीवर वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित चित्रे, फिनिशिंगचे कामे केली जाणार आहेत. चांदणी चौकातील संपूर्ण काम २५ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे.
काय म्हणतात अधिकारी
चांदणी चौक रस्ते प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. २५ मे पासून गर्डर टाकण्याचे काम सुरू होईल. २५ जुलैपर्यत चांदणी चौक येथील काम पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी होणार होते. परंतु पुलाचे काम पूर्ण न झाल्याने उद्घघाटन लांबणीवर पडले. चांदणी चौकात ३९७ कोटी खर्च करुन १७ किलोमीटर लांबीचे विविध रस्ते तयार करण्यात आले आहेत. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची कामे पूर्ण झाली आहेत.
अजून कोणती काम आहेत बाकी
- १५० मीटर लांबीच्या व ३२ मीटर रुंदीच्या पुलासाठी एकूण २२ खांब उभारले जात आहे.
- २२ पैकी बावधनच्या बाजूचे १० खांब उभारले गेले आहे.
- एनडीएच्या बाजूचे १२ खांब उभारण्याचे काम सुरू.
- रॅम्प ३ व रॅम्प ७ चे २० टक्के काम अपूर्ण आहे.