पुणे शहरात डायनिंग टेबल इतका मोठा डोसा, कुठे मिळतो, काय वैशिष्ट्ये, किंमत किती जाणून घ्या
Pune longest dosa : पुणे शहरात सर्वात लांब डोसा प्रसिद्ध झाला आहे. हा डोसा चार जणांच्या कुटुंबासाठी पुरेसा असतो. एका ठिकाणी सुरु झालेल्या कॅफेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याचा अन्य चार शाखा तयार करण्यात आल्या.
पुणे : खाद्यप्रेमी म्हणून सायंकाळ झाली की अनेकांच्या डोक्यात पहिला विचार येतो की आज आपण काय खायचे. स्वाद कोणत्या पदार्थाचा घ्यायचा आहे. मग अनेक जण दक्षिण भारतीय पदार्थ असलेले इडली, मसाला डोसा, वडा-सांबारकडे वळतात. पुणे शहरात सर्वत्र हे पदार्थ उपलब्ध आहेत. पुणे शहरात दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची अनेक हॉटेल्ससुद्धा आहेत. इडली, डोसा, वडा आदींसाठी इथे गर्दी असते. पुणे शहरात एका डायनिंग टेबल इतका मोठा डोसा मिळतो. पाच फूट लांबीचा हा डोसा अख्या कुटुंबाला पुरेसा असतो.
कुठे मिळतो डोसा
पुण्यातील ‘सा डोसा कॅफे’ मध्ये सुमारे पाच फूट लांबीचा विशेष डोसा मिळतो आहे. कौटुंबिक डोसा म्हणून तो प्रसिद्ध झाला आहे. शुभम संगनवार यांनी 2019 मध्ये पुण्यात सा डोसा कॅफे सुरू केला होता. म्हणजेच कोरोनाच्या दोन महिने आधी कॅफे सुरू केले होते. काही तरी वेगळे करावे म्हणून त्यांनी सर्वात मोठा पाच फूट लांबीचा डोसा तयार केला. फक्त आकारानेच नाहीतर त्याच्या चवीवरही त्यांनी काम केले. यामुळेच तो लोकांच्या पसंतीस उतरला आहे.
पुण्यात सुरु केल्या पाच शाखा
पुणे शहरात हा डोसा प्रसिद्ध झाल्यानंतर मागणी वाढू लागली. मग पुण्यात या कॅफेच्या 5 शाखा सुरु केल्या आहेत. प्रभात रोड गल्ली नंबर 8, कर्वे रोड, गरवारे कॉलेज, कचरे कॉलनी, एरंडवणे येथे ‘सा डोसा कॅफे’ मिळतो.
खास तव्याची निर्मिती
सर्वात लांब हा डोसा बनवण्यासाठी खास तवा तयार करुन घेतला. हा डोसा बनवण्यात शेफही माहिर आहेत. इतका मोठा असूनही हा डोसा कुठूनही तुटत नाही. या डोसामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार खास पोडी मसाला आणि लोणी, तेल, तूप वापरतो. या कॅफेमध्ये नारळाची चटणी आणि सांबारसोबत हा फॅमिली डोसाही मिळतो.
जवानांना मोफत
साधारणपणे हा डोसा चार लोकांसाठी पुरेसा असतो. म्हणजे दोन प्रौढ आणि दोन मुले. त्याची किंमत 399 रुपये आहे. हा डोसा आंबलेला नसतो, त्यामुळे पचन सुद्धा व्यवस्थित होते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी तो कधीही खाऊ शकतो. लष्कराच्या जवानांसाठी डोसे आणि जेवण याठिकाणी मोफत आहे, असे शुभम संगनवार यांनी सांगितले.