Pune सुपरफास्ट : पुणे जिल्ह्यातील पाच बातम्या एकाच क्लिकवर
पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबाला आपल्याच सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेल्या बड्या राजकीय गुरुला जामीन मिळाला आहे. तर पुणे मेट्रोच्या (Pune Metro) श्रेयासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. पुणेकरांसाठी दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्यांचा एकाच क्लिकवर आढावा
पुणे : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनासोबत म्युकरमायकोसिसचे रुग्णही घटल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तर पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत. पुणे महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी शासकीय वाहने मिळूनही वेगळा वाहन भत्ता लाटल्याचंही वृत्त आहे. पुणेकरांसाठी दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्यांचा एकाच क्लिकवर आढावा. (Pune City Superfast News on 15th July 2021)
संत तुकाराम महाराज पादुका नीरा नदी स्नान
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज 15 वा दिवस आहे. परंपरेनुसार या दिवशी वारीच्या वाटेवर पालखी पुणे जिल्ह्यामधून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. त्यापूर्वी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान करण्यात येते. यंदा हा सोहळा हा देहूमध्येच सुरु आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील परंपरा खंडित होऊ नये, यासाठी नीरा स्नान सोहळा देहूमधील इंद्रायणी नदीमध्ये प्रतिकात्मक पद्धतीने पार पडत आहे. यावेळी मुख्य मंदिर ते इंद्रायणी नदी घाट हा आकर्षक फुलांनी सजवत पायघड्या घालण्यात आल्या आहेत
शासकीय वाहने मिळूनही वाहन भत्ता
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा (Pune municipal corporation) वेगळाच पराक्रम समोर आला आहे. सरकारी वाहने (government vehicles) घेऊनही वेगळा वाहनभत्ता लाटल्याचा आरोप होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांच्या दाव्यानुसार, अनेक अधिकारी सरकारी वाहने वापरतात पण तरीही महापालिकेकडून वाहन भत्ताही घेतात. अशाने महापालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे.
आता महापालिकेने हे पैसे संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करुन वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. पण केवळ वेतन कपात उपयोगाची नाही तर अशा अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केली आहे.
राजकीय गुरु रघुनाथ येमुलला जामीन
पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबाला आपल्याच सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेल्या बड्या राजकीय गुरुला जामीन मिळाला आहे. राजकीय गुरु रघुनाथ येमुल (Raghunath Yemul) याला 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शिवाजीनगर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. बायकोचा पायगुण चांगला नाही, तिच्यामुळे तू आमदार-मंत्री होऊ शकणार नाहीस, असा सल्ला देऊन उद्योजक गणेश गायकवाडला पत्नीचा छ्ळ करायला प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप येमुलवर ठेवण्यात आला होता.
रघुनाथ येमुलच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. येमुलच्या विरोधात कुणी तक्रारदार पुढे आल्यास त्याला पुन्हा पोलीस कोठडी देता येऊ शकते, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता.
पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
पुणे मेट्रोच्या (Pune Metro) श्रेयासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देखरेखी खाली मेट्रोचं काम सुरु असल्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यावर राष्ट्रवादी ठाम आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी सत्ताधारी भाजप ठाम आहे. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कोथरुड मेट्रोची तांत्रिक चाचणी घेण्यात आली, मात्र उद्धाटनाच्या मुद्यावरुन दोन्ही पक्षात चांगलीच खडाजंगी होण्याची चिन्हं दिसून येत आहेत.
पिंपरीत म्युकरमायकोसिसचे रुग्णही घटले
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनासोबत म्युकरमायकोसिसचे रुग्णही घटले आहेत. शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने आता म्युकरमायकोसिसचे रुग्णही झपाट्याने घटत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक एप्रिल आणि मे महिन्यात होता. त्यावेळी वायसीएम रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे दिवसाला 5 ते 6 रुग्ण दाखल होत होते.
जूननंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या दिवसाला 1 ते 2 रुग्ण इतकी कमी झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरी चिंचवडशहरात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या एकूण 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 34 रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. 55 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
संबंधित बातम्या वाचा सविस्तर :
पुण्यातील अधिकाऱ्यांची चलाखी, सरकारी गाडी दिमतीला, तरीही वाहनभत्ता लाटला, आता पगारातून वसूल करणार
बायकोच्या छळाला प्रवृत्त करणारा पुण्याचा राजकीय गुरु रघुनाथ येमुल जामिनावर सुटला
कोयत्याने वार करत सावत्र आईची हत्या, पुण्यात 17 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात