अरेच्या पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यमदूत…
Pune News | पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गुरुवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने दोन वेगवेगळे आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीची गंभीरता समोर आली. वाहतूक कोंडीला त्रस्त पुणेकरांसाठी आम आदमी पक्षही सरसावला आहे. 'आप'ने थेट सिग्नल यंत्रणेची पूजा केली आहे.
प्रदीप कापसे, पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2024 | पुणेकर आणि वाहतूक कोंडी हे अतुट समीकरण झाले आहे. शासन प्रशासनाकडून अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा तयार केल्यानंतरही पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होत नाही. उलट वाहतूक कोंडी वाढत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका रोज चाकरमान्यांना बसतो. परंतु रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याची अवघड वाट काढावी लागते. यामुळे काही वेळा रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गुरुवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने दोन वेगवेगळे आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीची गंभीरता समोर आली.
काँग्रेसने आणला यमदूत
पुण्यातील स्वारगेट चौकात वेक अप पुणेकर आणि काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी वाहतूक कोंडीवर लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. काँग्रेसने आंदोलनात यमदूत आणला. वाहतूक कोंडीमुळे एम्बुलेंस वेळेत न पोहोचल्याने रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे यमदूत वाहतूक कोंडी सोडवण्याचे आवाहन करत आहे. तसेच यावेळी फलकही लावण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पुण्यातील ट्रॅफिकमुळे दवाखान्यात वेळेवर न पोहचू शकणाऱ्या रुग्णवाहिकेतील सिरियस रुग्णांना मी रोज घेऊन जातो.
आपकडून असे आंदोलन
वाहतूक कोंडीला त्रस्त पुणेकरांसाठी आम आदमी पक्षही सरसावला आहे. ‘आप’ने थेट सिग्नल यंत्रणेची पूजा केली आहे. पुण्यातील शिवणे भागात आम आदमी पार्टीने अनोखे आंदोलन केले आहे. आम आदमी पार्टी, वारजे विभाग यांच्या वतीने या ठिकाणी वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे आणि गेल्या पाच वर्षांपासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेचा पूजा केली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सिग्नल यंत्रणेला हार फुले वाहिली आहे. आपच्या या आंदोलनाची चर्चा परिसरात चांगलीच झाली.
रोज वाहतूक कोंडी
शिवणे भागात रोज सकाळी ८ ते 11 व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. गेल्या पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा चालू केली असती तर या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल, असे मत शहर उपाध्यक्ष निलेश वांजळे यांनी मांडले.