पुणे शहरातील डॉक्टरासह नऊ जणांची कोट्यवधीत फसवणूक? काय केले नेमके आरोपीने?
पुणे शहरात भामट्यांकडून फसवणुकीचे नवनवीन प्रकार केले जात आहे. आता बिट्स कॉइन, ब्लू पिक क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर जादा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत एकाने डॉक्टरसह 9 जणांची 1 कोटी 47 लाखांमध्ये फसवणूक केलीय.
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील न्युक्लेअस मॉलमधील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी सुरु करुन अनेकांची फसवणूक करण्याचा प्रकार मागील महिन्यात घडला होता. कोरोना काळात असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोणाकोणाची कर्ज थकली त्याची माहिती त्याने डेटा व्हेंडरकडून मिळवली. अन् कर्ज टॉपअॅप करुन देतो, असे सांगत फसवणूक केली होती. आता पुणे शहरातील फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला आहे. बिटस कॉइन आणि ब्लू पिक क्रिप्टो करन्सीत चांगल्या नफाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. एका डॉक्टरासह नऊ जणांची तब्बल एक कोटी 47 लाख रुपयांमध्ये फसवणूक झाली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
नेमके काय घडले
बिट्स कॉइन, ब्लू पिक क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर जादा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत एकाने डॉक्टरसह 9 जणांना तब्बल 1 कोटी 47 लाखांचा आर्थिक गंडा घातला. आरोपी इमरान खान याने बिट्स कॉइनमध्ये पैसे गुंतवल्यास 12 महिन्यांमध्ये दुप्पट रक्कम व ब्लू पिक मध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवणूक केलेल्या महिन्याला 15 टक्के व्याज मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर तक्रारदार व इतरांनी त्यांच्या योजनेत गुंतवणूक केली. परंतु सांगितल्यानुसार त्यांना रक्कम मिळाली नाही. मग मुलूंड पूर्व मुंबई येथील डॉ.पराग केमकर या डॉक्टरांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर याप्रकरणी इमरान खान (वय 35, रा. रिव्हरडेल सोसायटी, थिटेनगर, खराडी) याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे 2022 नंतर साकोरेनगर विमाननगर येथील बीट्स कॉईन व ब्लू पिक कंपनीच्या कार्यालयात घडली आहे.
अशी काळजी घ्या
ठग आणि भामटे तुम्हाला विविध आमिष दाखवत गुंतवणूक करण्याचे सांगतात. परंतु आपण ज्या योजनेत गुंतवणूक करत आहोत, त्याला कायदेशीर मान्यता आहे का? याची तपासणी आधी करावी. त्या कंपनीसंदर्भात सर्व माहिती घ्यावी.भारत सरकारकडून त्या कंपनीस व योजनेस मान्यता असेल तरच गुंतवणूक करावी. परंतु सध्या कोणत्याही योजनेत दुप्पट रक्कम होत नाही. दुप्पट रक्कम होण्यासाठी सात वर्षांपेक्षाही जास्त कालवधी लागतो. यामुळे आमिषला बळी न पडता सर्व तपासणी करुनच गुंतवणूक करावी.
हे ही वाचा
राजकीय नेत्यांना धमक्यांचे सत्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी
पुन्हा संकट, राज्यात पाच दिवस गारपीट, राज्यात कुठे कसा असणार अवकाळी पाऊस जाणून घ्या