पुण्यातील गुंडाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा, फोटो व्हायरल होताच मोठी कारवाई
Shivsena Shrikant Shinde | आ. गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या. त्यानंतर राजकारणातील गुंडगिरीवर चर्चा होऊ लागली आहे. त्यातच पुण्यातील गुंडाने खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्याचा फोटो व्हायरल झाला.
प्रदीप कापसे, पुणे, दि. 5 फेब्रुवारी 2024 | आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणास दोन दिवस झाले असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. पुणे शहरातील गुंड श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देताना फोटोत दिसत आहे. खासदार संजय राऊत यांनीसुद्धा हा फोटो टि्वट केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील हा गुंड कोण? याची विचारणा राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना करण्यात आली. हा व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत आणणाऱ्या शिवसेनेच्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
कोण आहे हेमंत दाभेकर
पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने अनिकेत जावळकर यांच्याबरोबर वर्षा निवासस्थानी जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. गुंड हेमंत दाभेकर हा किशोर मारणे याच्या खून प्रकरणात शरद मोहळ याच्यासोबत शिक्षा भोगत होता. हेमंत दाभेकर याच्यावर खून, अपहरण, खंडणी, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अनिकेत जावळकर याची हकालपट्टी
हेमंत दाभेकर याला वर्षा निवासस्थानी अनिकेत जावळकर याने नेले होते. यामुळे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी त्याच्यावर कारवाई केली. त्यांची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षकपदावरुन हकालपट्टी केली. त्याच्या पदाधिकाऱ्याच्या हकालपट्टीचे पत्र काढण्यात आले. हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली होती.
काय म्हटले होते संजय राऊत यांनी
संजय राऊत यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की,
मा. गृहमंत्री देवेन्द्रजी जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!