Ajit Pawar : चंद्रकांत पाटील यांना डावलत अजित पवार यांनी पुन्हा घेतली पुणे शहरासंदर्भात बैठक
Pune Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पदाची सूत्र घेतल्यापासून बैठकांचा सपाटा लावला आहे. विशेषत: पुणे शहरासंदर्भातील प्रश्नावर ते वारंवार बैठका घेत आहेत. यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.
पुणे | 14 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत आल्यापासून पुणे शहर आणि जिल्ह्यासंदर्भातील प्रश्नावर बैठका घेत आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असताना अजित पवार बैठका घेत असल्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता पुन्हा अजित पवार यांनी पुणे शहरातील प्रश्नासंदर्भात बैठक घेतली आहे.
कोणत्या विषयांवर झाली चर्चा
अजित पवार यांनी बुधवारी पुणे शहरातील विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली. पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांचे काम थांबता कामा नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. पुण्यातील मेट्रो, नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वे, रिंगरोडची कामे प्रशासकीय मान्यतेअभावी राहणार नाहीत याची काळजी घेण्याची अजित पवार यांनी प्रशासनला केली. सारथी संस्थेचे पुण्यातील मुख्यालय आणि विभागीय उपकेंद्राचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे अजित पवार यांनी सांगितले.
प्रकल्पांना मंजूर मिळण्यासाठी काम करणार
पुणे जिल्ह्यास राज्यातील प्रकल्पांना राज्य आणि केंद्र शासनाची मंजुरी मिळवणे, निविदा प्रक्रिया गतिमान करणे, विकास कामांच्या आड येणारी अतिक्रमणे तातडीने हटवणे, प्रशासकीय अडथळे दूर करणे या बाबींना प्राधान्य देण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या. पुणे मेट्रोच्या तिन्ही प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.
याची होती बैठकीला उपस्थिती
बैठकीला महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, तुकाराम मुंडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पुणे चिंचवड आणि पुणे मनपाचे आयुक्त, पुणे मेट्रोचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. परंतु पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील उपस्थित नव्हते.
याआधी फडणवीस यांच्या खात्याची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉरमध्येही अजित पवार यांनी घुसखोरी केली होती. ती चर्चा चांगली रंगली होती. अजित पवार यांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’च्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उर्जा खात्याची बैठक अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी घेतली होती. आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या अनुपस्थितीत पुणे जिल्ह्यातील विकास कामांची बैठक घेतली.