आमदारांचे वाहन नसताना विधानसभा सदस्याचा स्टीकर लावून गावभर रुबाब, मग काय घडले?
मागील काही दिवसांपासून rto सर्व नियम तोडून काही चार चाकी वाहनावर विधानसभा सदस्याचा खोटा स्टीकर लावून गाडी फिरत होती. वाहनावर एक गोलाकार स्टिकर होते. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे लिहिलेले होते.
विनय जगताप, पुणे : मागील काही दिवसांपासून काही चार चाकी वाहनांवर विधानसभा सदस्याचा खोटा स्टीकर लावून वाहन फिरत होते. गाडीत आमदार असल्यासारखा रुबाब त्या गाड्यांचा सुरु होता. उपप्रादेशक परिवहन विभागाच्या नियमांचे पालन त्या वाहनधारकांकडून होत नव्हते. मग पोलिसांनी त्या वाहनांचा पाठलाग देखील केला. परंतु त्याने गुंगारा दिला. ते वाहन मिळाले नाही. गाडीत खरंच आमदार आहेत की नाही, हे पोलिसांना पडलेले कोडे होते. परंतु परिसरात मात्र त्या गाडीची चर्चा होती. त्या स्टीकरमुळे आरटीओच्या नियमांचे पालन केले जात नव्हते. मग पोलिसांनी सापळा रचला अन् तो सापड्यात अडकला.
नेमके काय झाले
मागील काही दिवसापासून पुण्यातल्या सासवड शहर आणि परिसरामध्ये rto सर्व नियम मोडून काही चार चाकी वाहनावर विधानसभा सदस्याचा खोटा स्टीकर लावून गाडी फिरत होती. वाहनावर एक गोलाकार स्टिकर यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून आले होते. पोलिसांना संशय आला. त्यांनी त्या वाहनांचा पाठलाग देखील केला होता परंतु ती वाहने मिळून आलेली नाही.
असा आला सापळ्यात
पोलिसांनी त्या वाहनांचा शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू केली. त्यात एक क्रेटा गाडी मिळाली. त्या गाडीवर अशा प्रकारचे स्टीकर लावलेले होते. गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली. तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच गाडीमध्ये आमदार महोदय वगैरे कोणीही नव्हते. ही गाडी कोणत्या आमदाराची देखील नव्हती. गाडीचे मालक ऋतुराज गायकवाड राहणार काळेवाडी होता. हे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले.
नंबर प्लेचचे नियम मोडले
पोलिसांनी ती क्रेटा गाडीची तपासणी केली. त्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावलेली होती. तसेच गाडीला ब्लॅक फिलमिंग केलेले होते. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नव्हता. मग पोलिसांनी ही गाडी पोलीस स्टेशनला आणली. गाडीचा लोगो जप्त केला. मोटार वाहन कायद्याप्रमाणे 6500 रुपये दंड करण्यात आला आहे.
पोलिसांचे आवाहन
सासवड शहर आणि पुरंदर तालुक्यातील चार चाकी वाहनांवर बेकायदेशीर लोगो लावलेले आहेत. ते काढून टाकण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणीही अशा प्रकारचे लोगो गाडीवर लावणार नाही. जर आढळून आल्यास त्यांच्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणारं आहे. ही कारवाई डीबी पथकाचे पोलीस नाईक पोटे,पोलीस नाईक नांगरे, ट्रॅफिकचे पोलीस हवालदार शिंदे यांनी केली.