ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयाचे डीन ‘मेहरबान’, पत्र आले समोर
ललित पाटील ससून रुग्णालयात दीर्घ कालवधीपर्यंत कसा राहिला? या प्रश्नाचे उत्तर देणारे पत्र समोर आले आहे. ललित पाटील यांच्यावर सरळ अधिष्ठातच 'मेहरबान' झाले होते. त्यामुळे पाच महिने ललित पाटील रुग्णालयात राहिला. ललित पाटील याचा मुक्काम वाढवण्यासाठी हे पत्र दिले गेले.
रणजित जाधव, पुणे | 30 ऑक्टोंबर 2023 : ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटील याचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्यासाठी स्वत: अधिष्ठाता संजीव ठाकूर याची ‘मेहरबानी’ झाल्याची माहिती समोर आली आहे. ललित पाटील याच्यासाठी ससूनचे डीन म्हणजे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी वैद्यकीय अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यात त्यांनी ललित पाटील याला टीबी हा आजार झाल्याचे नमूद केले होते. ललित पाटील याला टीबी आजारासह पाठदुखीचा देखील आजार असल्याचाही उल्लेख पत्रात केला होता. आता हे पत्र समोर आल्यानंतर डॉ.संजीव ठाकूर यांच्यासमोर अडचण वाढणार आहे.
काय म्हटले आहे पत्रात
ललित पाटील संदर्भात 7 सप्टेंबर 2023 रोजी अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी वैद्यकीय अधीक्षकांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. त्यात त्यांनी ललित पाटील याला लठ्ठपणाचा आजार असल्याचे पत्रात स्पष्टपणे उल्लेख केला आहे. ललित पाटील याला टीबीचा आजार झाल्याचे म्हटले आहे. पाठदुखी आणि हर्नियाचा आजारही दाखवला आहे. त्याच्यावर मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे म्हटले आहे. ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवा यासाठी चक्क डीनकडून वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिले गेले आहे.
येरवडा जेल प्रशासनाला पाठवलेले पत्र समोर
ससूनचे डीन यांचा ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी आणखी एक प्रकरण आलं समोर आले आहे. ललित पाटील याला ससूनचे डीन संजीव ठाकूर यांनी वेळोवेळी मदत केल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. सात सप्टेंबर २०२३ मध्ये ललित पाटील याला टीबी झाल्याचे पत्र खुद्द ससूनचे डीनकडून दिले आहे. त्यावर त्यांची सही आणि शिक्का आहे. स्वत: डॉ. संजीव ठाकूर ललित पाटील याच्यावर उपचार करत होते.
कैद्यांच्या वार्ड १६ मध्ये डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडूनच ललित पाटील याच्यावर उपचार केले गेले. ससूनच्या रजिस्टरमध्ये यासंदर्भात नोंद आहे. ललित पाटील याला कोणते आजार झाले आहे? या प्रश्नावर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी यापूर्वी उत्तर दिले नव्हते. ललित याला चार ते पाच प्रकारचे आजार झाले आहे, असे त्यांनी म्हटले होते.