IMD prediction | भर उन्हाळ्यात राज्यात प्रथमच ऑरेंज अलर्ट, वाचा कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट
राज्यातील शेतकऱ्यांचे संकट कमी होत नाही. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोबत येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होणार आहे.
पुणे : राज्यात मार्च महिना अवकाळी पावसाचा झाला आहे. मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे. आता पुणे आयएमडीने पुन्हा राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट ऑरेंज दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटांवर संकट आले आहे. कारण यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अजून बाकी आहेत. आता पुन्हा पाऊस व गारपीटचे संकट आहे.
14/04: पिवळ्या इशाऱ्यांसह दर्शविल्या गेलेल्या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. ऑरेंज अलर्ट गारपिटीचीही शक्यता दर्शवते.Pl see IMD updates आणि विजेच्या धोक्यांपासून सर्व सुरक्षा खबरदारी घ्या pic.twitter.com/18hm2zsYaB
हे सुद्धा वाचा— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 14, 2023
कुठे काय अलर्ट
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होणार आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे की,१४ एप्रिल रोजी नगर, पुणे बीड, उस्मानाबाद, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तसेच धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच १५ आणि १६ एप्रिल रोजी काही ठिकाणी येलो अलर्ट आहे. १७ एप्रिलपासून वातावरण पुन्हा चांगले होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात पाऊस
नाशिक जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाल्याने नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा घास निसर्गाने हिरावून नेला आहे. नांदगाव तालुक्यात 48 गावांमधील 12 हजार 126 शेतकऱ्यांचे 5218 हेक्टरी क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात कांदा पिकाचे सर्वाधिक 4 हजार 830 हेक्टरवर नुकसान झाले. गहू, मका आणि भाजीपाल्याला देखील मोठी झळ बसली. वाऱ्याचा जोर जास्त असल्याने पत्रे उडून गेल्याने अनेक कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहे.
पुण्यात वीज कोसळली
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये निमगाव केतकी परिसरातील मदन पाटील यांची दुबत्या गायींवर अचानक वीज कोसळून एक गायी जागीच मृत्युमुखी पडली तर एक गाई जखमी झाली आहे.
इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके यामध्ये मका, गहू, हरभरा पाळीव जनावरांसाठी केलेले केलेला घास, आंबा ,केळी, पेरू, नारळ ,आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांमध्ये तर पाणी साचल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी ही धास्तावला आहे. शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत घोषित करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.