पुण्यात दोन नेत्यांमध्ये जुंपली, माझ्यावर टीका केली तर तुमचा घोटाळा काढणार…
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील दोन नेत्यांमध्ये अनेकवेळा वाद निर्माण होता. आता पुन्हा या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष पाहायला मिळत आहे. २०२४ मध्ये जनता कोणासोबत आहे, हे दाखवून देईल, अन्यथा निवृत्ती घ्यावी, असे आव्हान या नेत्यांनी दिले.
योगेश बोरसे, पुणे : पुणे जिल्ह्यातील राजकारणावर शरद पवार यांचे वर्चस्व आहे. परंतु आता इतर पक्षांनीही आपले अस्तित्व पुणे जिल्ह्यात निर्माण केले आहे. आपले वर्चस्व टिकवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून त्या पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न होत असतो. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील दोन नेत्यांचा वाद अनेक वेळा यापूर्वी समोर आला आहे. आता पुन्हा दोन माजी मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत. एकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्याची भाषा झाली आहे. तसेच पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कोणामध्ये सुरु झाला वाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यांवर तोफ डागली आहे. माझ्यावर टीका केली तर मी तुमच्या कारखान्यातील सगळ्या भानगडी बाहेर काढेल, असा इशारा दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिला आहे. हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यातील साखर अन् इथेनॉल त्यांनी कोणत्या दराने विक्री केली? याची चौकशी करण्याची वेळ आलीय, असा आरोप त्यांनी केला आहे. आपण हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यातील गैरकारभार बाहेर काढणार असल्याचा इशारा दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.
तर राजकारणातून निवृत्ती घेईल
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यांवर टीका करताना दत्तात्रय भरणे चांगलेच आक्रमक झाले. हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा जनतेने नाकारले आहे. तरी हे शांत घरी बसत नाहीत. आता २०२४ मध्ये पुन्हा समोरासमोर येऊ या. मी कमी पडलो तर 2024 ला लोक मला नाकारतील. त्यानंतर मी शांतपणे घरी बसेल, परंतु जनतेने त्यांना नाकारले तर त्यांनी राजकीय निवृत्ती घ्यावी, असे आव्हान माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिले.
यापूर्वी केली होती टीका
राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे मंत्री असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे विनाकारण फुकटचे श्रेय घेऊ नये, अशी टीका माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यांवर नाव न घेता केली होती.
हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी वॉररूम बनवली आहे. त्याठिकाणी कारखान्याचे अन् शिक्षण संस्थेतील कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यांकडून सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्याचे काम सुरू असल्याची टीकाही भरणे यांनी यापूर्वी केली होती.