Pune Rain | पुणे परिसरात दमदार पाऊस, कोणत्या धरणांमध्ये किती झाला जलसाठा
Pune dam storage | पुणे शहरातील नागरिकांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुण्यातील धरणांमध्ये जलसाठा चांगलाच वाढला आहे. त्याचा फायदा शेतीलाही होणार आहे.
पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहर आणि घाटमाथ्यावर गेल्या आठवडाभर चांगला पाऊस झाला. तसेच पुणे शहरात शुक्रवारी दमदार पाऊस झाला. एका दिवसात पुणे शहरात बारा मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक जलसाठा झाला. पुणेकरांची पावसाची चिंता मिटली आहे. पानशेत, वरसगाव धरण फुल्ल झाले आहे तर खडकवासला धरणही फुल्ल होण्याचा मार्गावर आहे.
खडकवासला साखळी क्षेत्रात पाऊस
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे खडकवासला धरण आता 96 टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. धरण साखळी क्षेत्रात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुणे शहराच्या एक वर्षाच्या पाण्याची तजवीज झाली आहे.
गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस
पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण महत्वाचे आहे. या धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासांत चांगला पाऊस झाला. खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरण यामुळे फुल्ल झाले आहे. पुण्यात गणरायाच्या आगमनासोबत पावसाला सुरुवात झाली होती. गेल्या आठ दहा दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरण भरण्याचा मार्गावर असल्यामुळे या धरणातून आजपासून रोज पाण्याचा विसर्ग होणार आहे.
कोणत्या धरणात किती जलसाठा
- खडकवासला – 1.86 TMC
- पानशेत – 10.65 TMC
- वरसगाव – 12.82TMC
- टेमघर- 2.91 TMC
- एकूण पाणीसाठा -28.23TMC
लोणीमध्ये जोरदार पाऊस
आंबेगाव तालुक्यात लोणी गावाला बारा महिने टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. शुक्रवारी लोणी धामणी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे ओढे, नाले दुथडी भरुन वाहू लागली. शेत शिवारात पाणी साचले. शेताचे बांध फुटून माती तसेच पिके ही गेली. शेतीचे नुकसान झाले असली तरी पाऊस झाल्याचा आनंद नागरिकांना जास्त झाला आहे. यामुळे या गावातील पाण्याची चिंता मिटणार आहे.