Kishor Aware Murder : किशोर आवारे यांच्या हत्येचा प्लॅन जानेवारीपासूनच, पण…
Kishor Aware : पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपींनी जानेवारी २०२३ पासून त्यांच्या हत्येचा प्लॅन केला होता. त्यासाठी योग्य संधी शोधत होते. एप्रिल महिन्यात प्रयत्न झाला.
पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना अटक झाली आहे. या हत्या प्रकरणात सुरुवातीला कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे नाव घेतले. किशोर आवारे यांच्या आईच्या आरोपानंतर आमदार सुनील शेळके यांचे नावही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना पकडले. त्यानंतर सूत्रधारापर्यंतही पोहचले. अन् प्रकरण वेगळ्या वळणावर आले. पोलिसांनी आरोपींना आपला खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलले. आरोपींनी आवारे यांच्या हत्येचा पूर्ण प्लॅनच पोलिसांसमोर उघड केला.
का केली हत्या
पोलिसांनी चारही आरोपींची कसून चौकशी सुरु केली. त्यांचे मोबाईल तपासले. त्यांच्या लोकेशन तपासले. त्यानंतर या प्रकरणाचा संबंध गौरव खळदे यांच्याशी असल्याचे समोर आले. मग त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने हत्या का केली हे पोलिसांना सांगितले. तो म्हणाला, की किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे वृक्षतोडीची तक्रार केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती, असा दावा भानू खळदे यांनी केला. यावरून खळदे आणि आवारे यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्येचा कट रचला.
जानेवारीपासून सुरु होता प्रयत्न
गौरव खळदे यांने जानेवारी २०२३ पासून किशोर आवारे यांच्या हत्येचं प्लॅनिंग सुरु होते. मग शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या झाली, त्यावेळी संधी साधण्याचा प्रयत्न झाला. या हत्या प्रकरणात महिन्याभरापूर्वी किशोर आवारे मावळ न्यायालयात जात होते. त्याचवेळी त्यांना ठार मारण्याचा प्लॅन ठरला. पण खूप गर्दी असल्याने तो प्लॅन यशस्वी झाला नाही. त्यावेळी आरोपींनी आवारे यांना त्यांचा मोबाईल नंबर मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु किशोर आवारे यांना काहीतरी शिजत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी तिथून काढता पाय घेतला.
एसआयटीची स्थापना
पोलिसांनी या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली आहे. या पथकामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल देवडे, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे आणि सहायक निरीक्षक संभाजी जाधव यांचा समावेश आहे.