पुणेकरांसाठी चांगली बातमी, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसंदर्भात महत्वाचे अपडेट
pune metro news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. त्यानंतर मेट्रोचे पुढील टप्पे कधी सुरु होणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागेल आहे. त्यातच महत्वाचा असणारा हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम कधी पूर्ण होणार? यासंदर्भात महत्वाचे अपडेट आले आहे.
प्रदीप कापसे, पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. पुणेकरांच्या पसंतीला ही मेट्रो आली. जास्तीत जास्त पुणेकर आता मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुणे शहरातील रस्तावरील खासगी वाहने कमी होत आहे. पुणे मेट्रोने शनिवार आणि रविवारी प्रवास भाड्यात सुट दिली आहे. त्याचाही फायदा अनेक जण घेत आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गच काम आता रुळावर आले आहे. कारण या मार्गाचे रुळ टाकण्यास सुरुवात झाली आहे.
रस्ते प्रवास म्हणजे कसरत
पुणे शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किमीचा रस्ता प्रवास म्हणजे एक कसरत असते. या प्रवासात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना वाहनधाराकांना करावा लागतो. २३ किलोमीटरसाठी दोन-दोन तास वाहनधारकांचे जातात. यामुळे या मार्गावर मेट्रोचे काम कधी पूर्ण होणार आहे, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता शुक्रवारपासून या मार्गच काम रुळावर आले. या मार्गावर रुळ टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
डेपोमध्ये चाचणीनंतर रुळ टाकण्यास सुरुवात
रुळ टाकण्यास सुरुवात करण्यापूर्वी डेपोमध्ये चाचणी घेण्यात आली. ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर रुळ टाकण्यास सुरुवात झाली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीएकडून सार्वजनिक खासगी भागीदारी (पीओपी) तत्वावर हे काम सुरु आहे. खासगी कंपनीला निविदेद्वारे हे काम दिले गेले आहे. मेट्रोच्या कामासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. पुढील ३५ वर्ष मेट्रोची जबाबदारी या कंपनीकडे दिली गेली आहे.
मार्गावर २३ स्थानके
पुणे मेट्रोचा शिवाजीनगर ते हिंजेवाडी हा उन्नत मार्ग आहे. २३.३ किमीच्या या मार्गावर आता खांब उभारणीनंतर रूळ टाकायला सुरुवात झाली आहे. या मार्गावर २३ स्थानके आहेत. सध्या पीपीपी तत्त्वावर या मार्गाचे पीएमआरडीएकडून काम सुरु आहे. यामुळे लवकरच हा मार्ग सुरु होईल, अशी अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काही दिवसांपूर्वी या मार्गाचा आढवा घेतला. त्यावेळी काम लवकरत लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.