Pune Metro | पुणे मेट्रोची विद्यार्थ्यांसाठी योजना, कसा मिळवता येणार फायदा
Pune Metro | पुणे मेट्रो चांगलीच लोकप्रिय झाली आहे. पुणेकर मेट्रोचा लाभ घेत आहे. त्याचवेळी सामाजिक जबाबदारी ओळखून पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी योजना आणली आहे. या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑगस्ट रोजी केले होते. त्यानंतर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मेट्रोकडून उत्पन्नाचे नवनवीन विक्रम केले जात आहेत. गणेश उत्सवाच्या काळात मेट्रोची सेवा सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत होती. त्या काळात पुणेकरांनी मेट्रोचा चांगलाच फायदा घेतला. पुणेकरांसाठी शनिवार आणि रविवारी सवलतीची योजना मेट्रोने आणली आहे. आता विद्यार्थ्यांसाठी आकर्षक योजना मेट्रोने आणली आहे. १३ वर्षे वयोगटाच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी ‘एक पुणे कार्ड’ नावाने ही योजना असणार आहे.
काय आहे मेट्रोची योजना
पुणे मेट्रोतून आता विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत आहेत. यामुळे मेट्रोने ‘एक पुणे विद्यार्थी पास’ प्रीपेड कार्ड आणले आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत मिळणार आहे. १३ पेक्षा जास्त वय असणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ही योजना आज ६ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कार्ड देशातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये वापरता येणार आहे.
कार्ड मिळणार मोफत
‘एक पुणे विद्यार्थी पास’ हे कार्ड पुणे मेट्रोच्या सर्वच स्थानकांवर मिळणार आहे. पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना हे कार्ड मोफत दिले जाणार आहे. या कार्डची किंमत १५० रुपये तर वार्षिक शुल्क ७५ रुपये ठेवण्यात आले आहे. १३ ते १८ वर्षे वय असणारे विद्यार्थी हे कार्ड घेऊ शकतात. कार्ड घेण्यासाठी शाळा किंवा महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र लागणार आहे. तसेच बोनाफाइड प्रमाणपत्रही लागणार आहे. कार्ड घेतल्यानंतर तिकीट दरात ३० टक्के सवलत मिळणार आहे.
कार्डवर रोज २० वेळा व्यवहार
‘एक पुणे विद्यार्थी पास’ हे कार्ड नॅशनल कॉमन मोबालिटी कार्ड (NCMC) आहे. त्यावर रोज २० वेळा व्यवहार करता येणार आहे. दोन हजार रुपयांपर्यंत व्यवहार त्यात होणार आहे. पुणे मेट्रोच्या कोणत्याही स्थानकावर कार्ड रिचार्ज करता येणार आहे. कार्ड घेणाऱ्या विद्यर्थ्याला तिकीटदरात ३० टक्के सवलत मिळणार असून त्याची वैधता तीन वर्षे आहे. कार्डसाठी पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर ई-फॉर्म उपलब्ध केला आहे.