Pune Metro | पुणे मेट्रो आता पोहचणार या स्थानकापर्यंत, चाचणी झाली यशस्वी
Pune Metro | पुणे मेट्रोचा अल्पवधीत लोकप्रिय झाली. पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळाला. यामुळे मेट्रोला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यातच पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे. पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे.
पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. पुणे शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी बस हाच पर्याय होता. परंतु आता मेट्रो सुरु झाली आहे. पुणे शहरातील वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी झाले. त्यानंतर पुणेकरांकडून मेट्रोला वाढता प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरातील इतर ठिकाणीही मेट्रोचा विस्तार केला जात आहे. त्याचवेळी एका नवीन मार्गावर चाचणी यशस्वी झाली आहे.
आता कोणत्या मार्गावर झाली चाचणी
पुणे मेट्रो सध्या वनाज ते रामवाडी धावत आहे. आता तिचा विस्तार होणार आहे. मेट्रोचा रूबी हॉल ते रामवाडी हा अंतिम टप्पा सुरु होणार आहे. त्यासाठी शनिवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. यामुळे व्यावसायिक तत्वावर डिसेंबरमध्ये रामवाडी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो सुरू होणार आहे. परंतु स्वारगेट ते मंडई आणि मंडई ते सिव्हिल कोर्ट असा मार्ग अजून बाकी आहे. हा टप्पा गाठण्यास वेळ लागणार आहे. कसबा पेठेतील मेट्रोचा भूयारी मार्ग सुरू होण्यास पुढील वर्षाचा एप्रिल महिना उजाडणार आहे.
पूर्ण मार्ग कधी सुरु होणार
पुणे मेट्रोचा पिंपरी-चिंचव़ड ते स्वारगेट हा संपूर्ण मार्ग आहे. सध्या शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट असा मार्ग सुरु झाला आहे. परंतु स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा मार्ग 5 किलोमीटर अंतराचा भूयारी मार्ग आहे. हा मार्ग शहराच्या मध्यभागातून जातो. या मार्गावर असणाऱ्या मंडई स्थानकाचे काम बाकी आहे. त्यामुळे हा मार्ग सुरु होण्यास बरीच वाट पहावी लागणार आहे.
चाचणीचे सर्व टप्पे यशस्वी
पुणे मेट्रोकडून रूबी हॉल ते रामवाडी या मार्गावर चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. ट्रॅक, वीज, सिग्नलिंग, देखभाल आणि ऑपरेशन्स हे सर्व टप्पे यशस्वी झाल्याचे मेट्रोकडून जाहीर करण्यात आले. तसेच चाचणी दरम्यान तज्ज्ञांच्या पथकाने ट्रॅकची कार्यक्षमता आणि सुरक्षितता, इलेक्ट्रिकल प्रणाली, सिग्नल याची पाहणी केली. त्यामुळे या मार्गावर मेट्रो सुरु करण्यास परवानगी मिळणार आहे.