पुणे येथील पुण्येश्वर मंदिरासंदर्भात एका महिन्यात कारवाई करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार
पुणे शहरातील पुण्यश्वर मंदिराचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. नुकताच झालेल्या पोटनिवडणुकीत हा मुद्दा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. आता मनसे यावर आक्रामक झाली आहे. एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिलाय.
योगेश बोरसे, पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मुंबईतील माहीमचा दर्गा अन् सांगली येथील मशिदीचा मुद्दा मांडला. सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम केले असल्याचा आरोप केला होता.आता पुण्यात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात मशिदी उभारण्यात आली आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. राज्य शासनाने यासंदर्भात एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिला आहे.
काय आहे वाद
पुण्यातील दोन धर्मस्थळांचा उल्लेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलाय. शहरातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागांवर दर्गा उभारण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. पुणे शहराला नाव महादेव मंदिरावरून पडले. तेच महादेव मंदिर म्हणजे पुण्येश्वर मंदिर आहे. आता हे मंदिर उपलब्ध नाही. त्याठिकाणी दर्गा उभारण्यात आला होता. आता हा दर्गा विस्तारला आहे, त्याविरोधात पुणे शहरातील हिंदुत्ववादी संघटना अनेक वर्षे भांडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर पुण्येश्वर मंदिरासाठी न्यायालयात दाद मागत आहेत. पुण्येश्वर मंदिराच्या जागी उभारण्यात आलेल्या दर्गा परिसरात आजही कमान, गणपती आणि कलश दिसतो.
मनसेने दिला इशारा
पुण्येश्वर मंदिरासंदर्भात एका महिन्याच्या आत कारवाई करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार असा इशारा अजय शिंदे यांनी दिला आहे. पुण्येश्वर मंदिराच्या कारवाई संदर्भात मनसेचा राज्य सरकारला एका महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणुकीत पुण्येश्वर मंदिराच्या घोषणा दिल्या होत्या. या घोषणा राजकीय न राहता त्यावर थेट कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेने केलीय.
काय आहे दावा
आता पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा आरोप मनसेने केला आहे. अलाउद्दीन खिलचीच्या काळात हे सर्व घडल्याचे अजय शिंदे यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, की यामंदिरांना मोठा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर यांच्यासह जे काही समकालीन संत होते त्यांनी याठिकाणी भजन, कीर्तन केले. संत एकनाथांच्या गाथेत याचा उल्लेख आहे. हे सर्व हिंदुस्थानावर इस्लामी आक्रमण झाले, त्या काळात या ठिकाणी मशीद उभारली गेली. हे आक्रमण पुण्यातच नाही तर देशात अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी मशिदी तसेच दर्गे उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.