हकालपट्टीनंतर मनसेलाच ‘जय महाराष्ट्र’, वसंत मोरे यांच्या खंद्या शिलेदारासह 400 कार्यकर्तेही पक्षातून बाहेर
पक्षातील पदाधिकारी आपल्याला विश्वासात घेत नाहीत. बैठकांना बोलावत नाहीत. मेळाव्याला, सभांना गेलं तरी भाषण करण्याची संधी देत नाहीत, असा आरोप वसंत मोरे यांनी केला होता.
पुणे : मनसेचे पुणे जिल्हा माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची गेल्याच महिन्यात माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशनानंतर ही हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, या हकालपट्टीनंतर माझिरे यांनी आता थेट पक्षालाच अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. विशेष म्हणजे मनसे नेते वसंत मोरे यांचे खंदे शिलेदार असलेल्या माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पुणे मनसेला मोठा हादरा बसला आहे.
अखेर मनसे नेते वसंत मोरे यांचे निकटवर्तीय निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. 28 नोव्हेंबर रोजी निलेश माझिरे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. निलेश माझिरे हे मनसेच्या पुणे जिल्हा माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते. या हकालपट्टीमुळेच निलेश माझिरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझिरे यांच्या 400 कार्यकर्त्यांनी देखील मनसेचा राजीनामा दिला आहे.
माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. माझिरे यांची हकालपट्टी आणि राजीनामा यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
पक्षातील पदाधिकारी आपल्याला विश्वासात घेत नाहीत. बैठकांना बोलावत नाहीत. मेळाव्याला, सभांना गेलं तरी भाषण करण्याची संधी देत नाहीत, असा आरोप वसंत मोरे यांनी केला होता.
तसेच पुण्याची मनसे राज ठाकरे यांच्यावरच अवलंबून आहे. महापालिकेच्या निवडणुकीची पक्षाने कोणतीही तयारी केली नाही. तसेच आजच्या घडीला निवडणूक लागल्यास पक्षाकडे निवडणुकीला उभे करता येईल एवढे उमेदवारही नाहीत, असा घरचा आहेरच मोरे यांनी दिला होता.
मोरे यांच्या या आरोपानंतर आता त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माझिरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. माझिरे यांनी यापूर्वीही मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. जून महिन्यात माझिरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते पुन्हा पक्षात आले होते. आता पुन्हा एकदा माझिरे हे मनसेतून बाहेर पडले असून ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.