पुण्यात आणखी एका मनसे नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
Pune Crime News : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता मनसेच्या आणखी एका नेत्याच्या मुलास धमकी मिळाली आहे. मनसे नेत्यांच्या मुलास का धमक्या येत आहे, हा विषय आता चर्चेला येत आहे.
पुणे : पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी दिली होती. तसेच मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी घडले होते. आता मनसेच्या आणखी एका नेत्याच्या मुलास धमकी मिळाली आहे.
कोणाला मिळाली धमकी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष असलेल्या साईनाथ बाबर यांच्या 16 वर्षीय मुलाला आता धमकी दिली आहे. आरती साईनाथ बाबर यांच्या म्हणण्यानुसार बाबरचा मुलगा सोसायटीतील इतर मुलांसोबत खेळत असताना धमकी दिली आहे. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नीने आरती यांनी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे.
काय झाला वाद
आरोपी महिलेचे नाव हवा पिर खान आहे. तिने बाबरच्या मुलाला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा विविध स्तरातून संताप आणि निषेध व्यक्त होत आहे. साईनाथ बाबर हे कायम चर्चेत राहिले आहे. कोरोना काळात त्यांनी शहवासीयांसाठी मोठे काम केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ तसेच एक कट्टर मनसैनिक म्हणून त्यांची पुण्यात ओळख आहे.
वसंत मोरे यांच्या मुलास धमकी प्रकरण
वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणाऱ्याला अटक झाली होती. आरोपीला पुण्यातील घोरपडी परिसरातून आरोपीला अटक केली. इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहेत. त्यानेच महेश लांडगे, अविनाश बागवे आणि वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिली होती. धमकी देत इमरान खंडणी मागत होता. एकतर्फी प्रेमातून मुलीच्या नावाने तो धमकी देत होता. केवळ प्रियसीला त्रास देण्यासाठी इम्रान हे सगळे प्रकार करत होता. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.