Good News पुणे-मुंबई प्रवास आता फक्त तासाभरात, देशातील होणार ‘हा’ विक्रम
पुणे शहरातील प्रवाशांचा मुंबईला येण्यासाठी वेळ वाचणार आहे. नॅरो बॉडी विमानाचा वापर करून दोन शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरूहोत आहे. टाटा समूहाची एअर इंडियातर्फे ही विमानसेवा सुरु केली जाणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झालीय
पुणे : पुणेकरांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी आता पूर्ण झाली आहे. आता पुणे मुंबई प्रवास तासाभरात करता येणे शक्य होणार आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाकडून येत्या 26 मार्चपासून मुंबई-पुणे, पुणे-मुंबई दरम्यान हवाई सेवा सुरू होणार आहे. या विमानसेवेमुळे आणखी एक विक्रम नोंदवला जाणार आहे. यापूर्वी जेटएअरवेजची सेवा होती. ती बंद झाल्यानंतर पुणे-मुंबई थेट विमानसेवा नव्हती. आता 26 मार्चपासून ती सुरु होणार असल्याने मुंबईहून विदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.
होणार हा विक्रम
पुणे ते मुंबई हा हवाई मार्ग फक्त 124 किलोमीटरचा आहे. देशातील सर्वांत कमी अंतराचा हा हवाई मार्ग ठरणार आहे. यापूर्वी देशातील सर्वांत कमी अंतराचा हवाई मार्ग कोझिकोड ते कन्नूर हा 95 किमीचा होता. परंतु एअर इंडियाने ही सेवा बंद केली आहे. यामुळे पुणे ते मुंबई हा सर्वात कमी अंतराचा हवाई मार्ग असेल.
काय आहेत वेळा
नॅरो बॉडी विमानाचा वापर करून दोन शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करणारी एअर इंडिया ही पहिली विमान कंपनी ठरणार आहे. एअर इंडिया आपले सर्वात लहान विमान, एअरबस A319 चा वापर करणार आहे. शनिवार वगळता दररोज दोन शहरांदरम्यान हे विमान उड्डाण करेल. मुंबईवरून सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी विमान उड्डाण करेल आणि ते 10 वाजून 45 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. पुण्यातून हे विमान सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी उड्डाण करेल आणि मुंबईत 12 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. पुणे शहरातून आपल्या वाहनेने बाहेर पडण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त वेळ लागतो. परंतु विमानाने तासाभरात मुंबई गाठता येणार आहे.
प्रवाशांना होणार फायदा
एअर इंडियाने थेट उड्डाण सेवा सुरू केल्यामुळे मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाण करणारे प्रवासी पुणे ते मुंबईचे विमान पकडू शकतात आणि नंतर आंतरराष्ट्रीय विमानात स्थानांतरित करू शकतात. आता एअर इंडियाने ही सेवा सुरू केल्याने पुणेकरांचा वेळ वाचणार असून फायदाही होणार आहे. पुणे-मुंबई ही थेट विमानसेवा जेट एअरवेजकडून सुरू होती, परंतु ती बंद करण्यात आली. पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी खूप काळापासून होत होती.