Weather update | राज्यात गणरायाच्या आगमनासोबत पाऊस, मुंबई, पुणे शहरात यलो अलर्ट
Maharashtra Weather Forecast | राज्यात गेल्या तीन, चार दिवसांपासून अनेक भागांत पाऊस पडत आहे. आता गणरायाच्या आगमनासोबत मंगळवारी पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी मंगळवारी पावसाचा अलर्ट दिला आहे.
पुणे | 19 सप्टेंबर 2023 : राज्यात काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. मंगळवारी घराघरात गणरायाचे आगमन होत आहे. ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाला घरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात आणण्यात येणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पाऊससुद्धा असणार आहे. हवामान विभागाने पुणे, मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अन्य भागात ग्रीन अलर्ट असणार आहे. परंतु सर्वत्र मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडणार आहे.
आगामी पाच दिवस पावसाचे
गणरायाचे स्वागत पावसाने झाल्यानंतर पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज २४ सप्टेंबरपर्यंत दिला आहे. विदर्भात २३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मध्य प्रदेशात यामुळे जोरदार पाऊस सुरु आहे.
मुंबई, नाशिकमधील अनेक भागांत पाऊस
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. मंगळवारी सकाळी अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नाशिक शहरात पाऊस सुरु आहे. नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल्स आहे. या ठिकाणी पावसामुळे दुकानांमध्ये पाणी शिरले. शहापूरसह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे.
पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता
पुणे शहरातील मंगळवारी हवामान ढगाळ राहणार आहे. पुण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु पुणे विभागातील घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
भातसा धरणाची पातळी वाढली
ठाणे जिल्ह्यातील भातसा धरणाच्या क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहे. यामुळे शहापूर, मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, तसेच सापगाव नदीकाठावरील इतर गावांतील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.