Pune News | पुणे शहराजवळ गॅस टँकर पलटले, गणेशोत्सवात पीएमपीएमएलच्या तिजोरीत किती आली रक्कम
Pune News | पुणे शहरात गणेशोत्सवाची चांगलीच धूम होती. या काळात भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलने २४ तास सेवा दिली. त्यामुळे भाविकांची सोय झाली. त्याचवेळी पीएमपीएमएलच्या तिजोरीत चांगलीच भर पडली.
पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात गणेशोत्सवात पीएमपीएल प्रशासनाला चांगलाच फायदा झाला आहे. गणेशोत्सवातील दहा दिवसांत पीएमपीएमएलने (pmpml) चांगली सेवा दिली. त्यामुळे 19 कोटी रुपयांचे उत्पन्न पीएमपीएमएला मिळाले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 24 लाख रुपयांनी पीएमपीएमएलचे उत्पन्न वाढले आहे. या काळात रात्रभर पीएमपीएमएलची बस सेवा सुरु होती. गणेशोत्सव काळात 672 अतिरिक्त बस धावल्या. पुणे शहरातील गणेश भक्तांना यामुळे रात्रीही देखावे पाहण्याचा आनंद घेता आला.
३३४ टन कचरा आणि ७ कंटेनर चपला, बूट जमा
गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता होताच पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रमुख विसर्जन मार्गासह परिसरातील गल्लीबोळामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली. मनपा कर्मचाऱ्यांनी ३३४ टन कचरा जमा केला. तसेच ७ कंटेनर चपला, बूट जमा झाले. शहरातील पेठांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. त्यात पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, खाद्य पदार्थांचे बॉक्स याचा समावेश असतो.
खंडाळा घाटात गाडीने घेतला पेट
शुक्रवारी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात महिंद्रा पिकअप गाडीने पेट घेतली. या घटनेत गाडी जळून खाक झाली. चालक कमलेश यादव कुरियरचा माल घेऊन मुंबईवरुन पुण्याला जात होता. अचानक गाडीतून जळालेल्या वास आला आणि बोनेटमधून धूर येऊ लागला. बोनेटमध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गाडी आगीच्या भक्षस्थानी पडण्यापूर्वी चालकाने 21 बॉक्स बाहेर काढले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प ढाली होती.
गॅस टँकर पलटी, वाहतूक थांबवली
पुणे शहराजवळील लोणीकंद केसनंद रस्त्यावर पहाटेच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाला. त्यानंतर गॅस टँकरमधून गॅस लिकेज होत होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी केसनंद – लोणीकंद रोड वाहतुकीसाठी बंद केला. इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅनच्या सहाय्याने भारत गॅस कंपनीचा दुसरा टँकर बोलून त्यामध्ये गॅस शिफ्ट करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या.
शाळांचे खासगीकरण थांबवण्यासाठी आंदोलन
राज्यातील सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण थांबवण्यासाठी तसेच शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे बंद करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील शिक्षक संघाकडून 2 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.