पुणे स्पेशल सेलची मोठी कारवाई, पाकिस्तानी घुसखोराच्या मुसक्या आवळल्या
पुणे पोलिसांनी पाकिस्तानी नागरिकास अटक केली आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांनीही घुसखोरांवर कारवाई सुरु केली आहे. मुंबईही बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत.
पुणे : पुण्यातून (Pune) एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे शहरात एक पाकिस्तानी (Pakistan) तरुण अवैधरित्या राहत होता, त्याला पुणे पोलिसांच्या स्पेशल सेलने पकडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाकडून भारताचा बनावट पासपोर्ट (Indian Passport) मिळाला आहे. हा तरुण कधीपासून पुण्यात राहत आहे, त्याचा संबंध दहशतवादी कारवायांशी आहेत का? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. पुणे पोलिसांबरोबर मुंबई पोलिसांनीही घुसखोरांवर कारवाई सुरु केली आहे. मुंबईही बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत.
पुणे पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अमन अन्सारी (वय 22) आहे. अन्सारी विरुद्ध खरक पोलीस ठाण्यात फॉरेनर्स अॅक्ट, 1946 च्या कलम 14 आणि पासपोर्ट कायद्याच्या कलम 14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्सारी पाकिस्तानी नागरिक
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी हा पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात अवैधरित्या राहत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हाच त्याच्याकडून भारतीय पासपोर्ट सापडला. अन्सारीने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट बनवला होता. तो पुण्याहून अनेक वेळा दुबईला गेल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांची चौकशी सुरु
अन्सारीला बेकायदा मुक्कामाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अन्सारीच्या बेकायदेशीर वास्तव्यामागे काय हेतू होता आणि तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे का? या संदर्भात चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे करत आहेत.
मुंबई एटीएसची कारवाई
नवी मुंबई एटीएसने 4 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. नवी मुंबई शहरातूनच अटक करण्यात आली आहे. चार आरोपींपैकी एक आरोपी जवळपास दहा वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत होता. उर्वरित 3 आरोपीही बराच काळ राहत होते.बेकायदेशीररीत्या भारतात येण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवण्याचे प्रकरण समोर आले आहे. याशिवाय त्यांच्याकडे आणखी काही लिंक आहे का, त्याचा तपास सुरू आहे.