वरंध घाट एप्रिल, मे महिन्यातच बंद, वाहनधाराकांना काय असणार पर्याय
pune varandha ghat: 8 एप्रिल पासून ते 30 मे 2024 पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाट बंद केला जातो. या परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे प्रशासनाकडून घाट बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. पुणे येथून भोरमार्गे महाडला जाण्यासाठी जवळचा पर्याय असणारा वरंधा घाट बंद होत असतो. आता एप्रिल, मे महिन्यात हा घाट बंद करण्यात आला आहे. आता हा घाट बंद केल्यामुळे वाहनधारकांना ताम्हिनी घाटाचा पर्याय असणार आहे.
काय म्हटले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी
रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत काम सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम केले जात आहेत. या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे 8 एप्रिल पासून ते 30 मे 2024 पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
हा असणार पर्याय
नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा- पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. पारमाची वाडी ते रायगड जिल्हा या ठिकाणी रस्त्याचे काम आता सुरु करण्यात येत आहे. या रस्त्यात दरी व उंच डोंगर आहे. तसेच रस्त्याची रुंदी कामी आहे.
एस.टी. वाहतूक यापूर्वीच केली बंद
राज्य परिवहन महामंडळाने वरंधा घाटातून वाहतूक यापूर्वीच बंद केली आहे. भोर, पुणे डेपो व इतर डेपोंच्या एस.टी.बसेस वरंधा घाटातून गेल्या आठ दिवसांपासून जात नाही. आता सर्वच वाहनांसाठी वरंधा घाट बंद झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांना दुसऱ्या मार्गाने जावे लागणार आहे.