Pune Crime : पुणे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले, पुण्यात अपघाताचे किती आहेत ‘ब्लॅकस्पॉट’
Pune Crime News : पुणे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. पुण्यात कुठे वाढेल अपघात...
पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात देशात सर्वाधिक वाहने आहेत. परंतु पुणे शहरातील रस्ते सुरक्षित नाहीत. यामुळे पुणे शहरात अपघातांचे प्रमाण जास्त आहे. या अपघातांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागते. अनेक रस्ते अपघात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे होतात. 2020 नंतर पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण 113 टक्के वाढले आहे. या अपघातामध्ये मोटारसायकलने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले आहे.
अपघाताचे ‘ब्लॅकस्पॉट’ कोणते?
पुणे शहर आणि जिल्ह्यात अपघाताचे ‘ब्लॅकस्पॉट’ कोणते आहेत, ते शोधून काढण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि परिवहन विभागाने वारंवार अपघात होणाऱ्या 63 ठिकाणांचा अभ्यास केला आहे. पुणे शहरातील नवले पूल आणि पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. पुणे बंगळुरु महामार्गाही धोकादायक असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
काय आहे ‘ब्लॅकस्पॉट’
ब्लॅकस्पॉट अशी जागा आहे, जिथे रस्ते वाहतूक अपघात जास्त होतात. शास्त्रीय पद्धतीने रस्ते नसणे, सरळ रस्त्यावर उताराचे प्रमाण, अंधा मोड म्हणजेच समोरुन येणारे वाहन न दिसणे, क्रॉसींगची जागा अशा ठिकाणी वारंवार अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर वाहतूक चिन्ह लावणे, वेग प्रतिबंध बसवणे, स्पीड कॅमेरे हा ही उपाय आहे.
यांची बैठकीला उपस्थिती
पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अपघातासंदर्भात घेतलेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बप्पा बहिर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, परिवहन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे उपस्थित होते.
बैठकीत अभियंता बप्पा बहिर यांनी जिल्ह्यातील ६३ ठिकाणांची माहिती दिली, ज्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सर्व ठिकाणांवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.