Rain in Baramati : बारामतीत धडामधूम, वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला
Rain in Baramati : बारामतीत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.
बारामीत: आज येईल… उद्या येईल… ज्याची अतूरतेने वाट पाहिली जात होती त्या पावसाने आज बारामतीत (baramati) दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट करतच पावसाने बारामतीत जोरदार दस्तक दिली. अचानक आलेल्या आणि जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे (rain) बारामतीकरांची एकच तारांबळ उडाली. पावसाने काही क्षणातच संपूर्ण बारामतीत दाणादाण उडवून दिली. जोरदार वाऱ्यासह पावसाने (monsoon) अक्षरश: झोडपून काढल्याने बारामतीकरांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेऊन पावसापासून बचाव केला. तर, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही क्षणातच संपूर्ण शहरात गारवा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैरान झालेल्या बारामतीकरांना दिलासा मिळाला. तर बच्चे कंपनीने या पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. काही ठिकाणी पावसामुळे विजेचा लपंडाव झाल्याचं वृत्त आहे.
बारामतीत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. दुपारनंतर शहरात कमालीचा उकाडा जाणवून लागला. त्यानंतर संध्याकाळी ढग दाटून आले आणि अचानक जोराचे वारे वाहू लागले. त्यानंतर काही वेळाने ढगांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरीकांची उडाली धांदल. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांनी सुरक्षित ठिकाणांचा आसरा घेतला. रेनकोट आणि छत्र्यासोबत नसल्याने अनेकांना एकाच ठिकाणी तिष्ठत थांबावे लागले आहे.
भर रस्त्यात झाडे कोसळली
या अवकाळी आणि वादळी पावसामुळे बारामतीत झाडांची पडझड झाली. बारामतीतील भिगवण रस्त्यावर विविध भागात झाडे पडली असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. रस्त्यांवर पडलेली ही झाडे बाजूला करण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याचं वृत्त आहे. तर अनेक भागात पाणी साचल्याचंही वृत्त आहे. बारामतीतील काही भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याचंही सांगण्यात येत आहे.
अंदाज खरा ठरला
हवामान खात्याकडून नेहमी पावसाचे अंदाज व्यक्त केले जातात. पण हे अंदाज नेहमीच चुकतात. त्यामुळे हवामान खात्याची नेहमीच टर उडवली जाते. पण बारामतीसह राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. हवामान खात्याचा हा इशारा खरा ठरला आहे.