शिवसेना अन् वंचितच्या जागेवर रामदास आठवले यांचा डोळा
Lok Sabha Election 2024 | देशात यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने दहा जागांवर दावा केला आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन जागा आहेत.
सुनिल थिगळे, कोरेगाव भीमा, पुणे , दि. 1 जानेवारी 2024 | देशात यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्त्वाखाली एनडीए आघाडी करण्यात आली आहे तर विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली आहे. एनडीए मध्ये निमंत्रक किंवा संयोजक पदावरून कोणताही वाद नाही. आम्हाला देशभरात लोकसभेच्या दहा जागा मिळाव्यात. त्यातील दोन जागा महाराष्ट्रातील मिळाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली. राज्यात ज्या दोन जागा आम्ही मागत आहोत त्यात शिर्डी येथील जागा आहे. शिर्डीमधून आपण स्वत: लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. रामदास आठवले यांच्या या दाव्यामुळे शिवसेनेचे विद्यामान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासमोर अडचण निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा प्रश्न कसा सोडवणार? यावर खासदार लोखंडे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. तसेच सोलापूरच्या जागेची मागणी आठवले यांनी केली आहे. यामुळे सोलपूरची जागा आठवले यांना मिळाल्यास प्रकाश आंबडेकर यांची अडचण होणार आहे.
काय म्हणाले रामदास आठवले
आगामी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जिंकणे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देणे हाच माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. आगामी निवडणुका आम्ही रिपब्लिक पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहे. त्यासाठी चिन्ह मिळविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. एनडीएमधील राज्यातील घटक लक्ष त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला 400 च्या पुढे जागा जिंकायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मजबूत करायचे आहे.
राज्यात आम्ही 40 जागा जिंकणार
लोकसभेसंदर्भात ओपिनियन पोलमध्ये महायुतीला कमी जागा दाखवल्या. परंतु आम्ही 40 जागा जिंकणार आहोत. यापूर्वीचे निवडणुकांमधील सर्वे काय होते आणि निकाल काय आले, हे सर्वांनी पाहिले आहे. देशात निर्माण करण्यात आलेली इंडिया आघाडी ही विकासासाठी नसून फक्त मोदींना हरविण्यासाठी आहे. ज्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करायला शिकवले आहे.अन्याय विरुद्ध लढा द्यायचं शिकवलं आहे. त्याच पद्धतीने लढा देण्याचं संकल्प आम्ही करत आहोत. हे नवीन वर्ष देशासाठी तसेच दलितांच्या साठी खूपच महत्त्वाचं आहे, असे आठवले यांनी सांगितले.
सोलापूरची जागा रिपाईला हवी
सोलापूर आणि शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्या, अशी मागणी अक्कलकोट आरपीआयच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांना तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.