लोणावळ्यात तुफान पाऊस, तीन दिवसांत तब्बल 705 मिमी बरसला, शाळांना सुट्टी
Rain News : राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. परंतु अजूनही मागील वर्षापेक्षा कमी पाऊस आहे.
रणजित जाधव, लोणावळा, पुणे | 20 जुलै 2023 : राज्यातील सर्वच भागांत पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी व्यक्त केला आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल 705 मिमी पाऊस लोणावळ्यात झाला आहे. गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळ्यात विक्रमी पाऊस
लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत लोणावळ्यात 295 मिमी पाऊस झाला आहे तर मंकी हिल येथे 302 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कर्जतला 292 मिमी तर नेरळला 171 पाऊस झाला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस झाला आहे. तीन दिवसांत तब्बल 705 मिमी पाऊस कोसळला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही मंदावली आहे.
विक्रमी पावसानंतरही…
लोणावळ्यात विक्रमी पाऊस झाला आहे. परंतु यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2622 मिमी पाऊस बरसला होता, यंदा मात्र केवळ 2017 मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे. परंतु यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले आहे. यामुळे एकंदरीत कमी पावसाची नोंद झाली आहे.
शाळांना सुट्टी
लोणावळा येथे सुरु असलेल्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. परिस्थिती पाहून पुन्हा शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
पुणे प्रशासन सज्ज
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे प्रशासनही सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या. जिल्ह्यातील दरड आणि पूरप्रवण गावांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयात थांबण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळ गडाजवळ असलेल्या ठाकूरवाडी गावावर झालेल्या घटनेनंतर अधिक लक्ष दिले जात आहे.