शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी, इस्रोच्या अहवालात धक्कादायक वास्तव उघड
Farmer News : देशभरातील शेतकऱ्यांना विचार करण्यास भाग पाडणारा अहवाल भारतीय अंतराळ संस्थेने म्हणजेच इस्त्रोने तयार केला आहे. देशातील शेती अन् शेतकऱ्यांसंदर्भात हा अहवाल असून त्यातून आजची परिस्थिती समोर आली आहे.
पुणे : भारतीय अंतराळ संस्थेने (इस्त्रो) देशातील शेती अन् शेतकऱ्यासंदर्भात एक महत्वाचा अहवाल तयार केला आहे. परंतु हा अहवाल देशभरातील शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणार आहे. इस्रोने देशाचा वाळवंटीकरण आणि जमिनीचा खालावलेला दर्जा यावर अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशातील किती जमिनीचे वाळवंटीकरण झाले आहे? त्याची काय कारणे आहेत? यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय अंतराळ संस्थेच्या अहवालातून देशातील जमिनीच्या दर्जाबाबत धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
काय आहे अहवाल
महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा इस्त्रोचा अहवाल आहे. देशातील २९ टक्क्यांहून अधिक जमिनीचा दर्जा खालावला असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. इस्रोच्या अहवालातून देशातील जमिनीच्या दर्जाबाबत धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वाधिक दर्जा खालावलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. यामध्ये राजस्थान, गुजरात, कर्नाटक, लडाख, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील जमिनीचा दर्जा कामालीचा खालवला असल्याचे म्हटले आहे.
८३.६९ दशलक्ष हेक्टर जमिनीचे वाळवंटीकरण
इस्रोने देशाचा वाळवंटीकरण आणि जमिनीचा खालावलेला दर्जा यावर अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार देशातील ९७.८५ दशलक्ष हेक्टर म्हणजे २९.७ टक्के जमिनीचा दर्जा खालावला आहे. यातील ८३.६९ दशलक्ष हेक्टर जमिनीचे वाळवंटीकरण झालेय आहे.
का खालवत आहे दर्जा
पाणी आणि हवेमुळे जमिनीची होत असलेली धूप, हिरवळ कमी होणे, हवामान बदल अशा सर्व कारणांमुळे जमिनीचा दर्जा खालावत असल्याचे म्हटले आहे. जमिनीचा दर्जा खालावण्यासाठी हवामान आणि दुष्काळ हीसुद्धा महत्त्वाची कारणे आहे. कोरडवाहू क्षेत्रातील जमिनीचा दर्जा खालावत जाणे म्हणजे त्या प्रदेशाचे वाळवंटीकरण होणे असल्याचे म्हटले आहे.
हवामान बदलाचा परिणाम
हवामान बदलाचा परिणाम हा अंदाजापेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे बेमोसमी पाऊस पडणे आता सामान्य झाले आहे. 2030 पर्यंत पीक उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल असे मानले जाते. या बदलाचा सर्वाधिक परिणाम हा मका आणि गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तापमानात अंदाजे वाढ, पावसाच्या स्वरुपात बदल आणि मानववंशीय हरितगृह वायू उत्सर्जनातून पृष्ठभागावरील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे पीक उत्पन्नात मोठा बदल होणार आहे.