अजित पवार यांच्या नातेवाईकांसह अनेकांना गडवणारा रॉबिनहुड गजाआड, तो रॉबिनहुडप्रमाणे काम करायचा
या चोरट्याने चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या घरी चोरी केली. मग त्याला पकडण्यासाठी पोलीस कामाला लागले.
पुणे : रॉबिनहुड इंग्रजी कथेतील पात्र. श्रीमंताची संपत्ती लुटून ती गरिबांमध्ये वाटायचा. परंतु त्या कथेतील पात्रानंतर अनेक रॉबिनहुड तयार झाले. हे रॉबिनहुड श्रीमंतांना लुटतात पण स्वत:साठीच. पुण्यातील अशाच एका रॉबिनहुडचा शोध पोलिसांनी सुरु केला होता. हा हायप्रोफाईल चोरटा रॉबिनहुडसारखेच काम करत होता. म्हणजेच चोरीच्या पैशांनी सामजिक काम. परंतु चोऱ्या नेहमी हायप्रोफाईल व्यक्तींकडे करत होता. या चोरट्याने चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या घरी चोरी केली. मग त्याला पकडण्यासाठी पोलीस कामाला लागले. तब्बल पंजाबपर्यंत पोलीस गेले अन् ठेवटी त्याला पकडण्यात यश आले. त्याच्याकडून 1 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.
मुख्यमंत्र्यांच्या जावयाकडे चोरी
दिल्लीचे आरोग्यमंत्री, गोव्याचे राज्यपाल, दिल्लीतील न्यायाधीश आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांच्या जावयाच्या घरी चोरी करणाऱ्या रॉबीनहुडने अजित पवार यांच्या नातेवाईकांनीही सोडले नाही. त्याच्यावर उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, तामिळनाडू येथे घरफोडीचे गुन्हे असून हे सर्व गुन्हे उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या परिसरातील आहेत.
तीन पथके केली
बाणेर रोड येथील सिंध सोसायटीत रॉबीनहूड म्हणजेच मोहम्मद इरफान याने साथीदारांसोबत 10 फेब्रुवारी रोजी चोरी केली होती. अजित पवार यांचे नातेवाईक जगदीश कदम यांच्या घरी चोरट्याने केली होती. मग पोलिसांनी तातडीने तीन पथके तयार केली. घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मुद्दावरून आरोपींचा शोध घेण्यात आला.
यावेळी आरोपीने गुन्ह्यात जॅग्वार कार वापरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पुणे ते नाशिक मार्गावरील 200 सीसीटीव्हींची पडताळणी केली. गाडीचा नंबर मिळवत पोलिसांनी रॉबिनहूडचा शोध घेतला. प्रत्येकवेळी तो गाडीची नंबर प्लेट बदल होता.
पोलीस बनले बिगारी कामगार
आरोपी दिल्लीला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दिल्ली गाठली. परंतु तो पंजाबमधील जालंधर येथे पळाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस पंजाबमध्ये पोहचले. पोलिसांनी बिगारी कामगारांचे वेशांतर करून आरोपीला पकडले. आरोपीकडून जॅग्वार कार, पिस्तूल, दागिने जप्त केले. गुन्ह्यातील घड्याळ शमीम शेख याच्यामाध्यमातून मुंबई येथे विक्रीकरीता दिले. पोलिसांनी मुंबई येथून उर्वरीत तिघांना अटक केली.
रॉबिनहुड गुगलवर वेगवेगळ्या शहरातील हायप्रोफाईल ठिकाण शोधून तिथे चोरीचा प्लॅन करत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात एक जॅग्वार कारगाडी,10 किमती घड्याळ, काही दागिने आणि एक पिस्टल आणि 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
चोरीतून सामाजिक काम
रॉबिनहुड हा मूळ बिहारमधील जोगिया गावातील रहिवासी आहे. चोरीच्या पैशातून त्याने त्याच्या मूळ गावात अनेक सामाजिक कामे केली आहेत. रस्ता, रस्त्यावर लाईटींग आणि नागरिकांच्या मदतीला धावून जात असल्याने स्थानिक नागरिकांनीच त्याला रॉबीनहूड नाव दिले. त्याची पत्नी ही संबधीत भागातील जिल्हा परिषद सदस्य असल्याचेही सांगण्यात आले.