अजितदादा मित्र मंडळाचे नेते दिल्लीत गेले अन् ईडीच्या धाडी पडल्या?; रोहित पवार यांचा नेमका दावा काय?
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर धाडी पडल्या आहेत. काल ईडीच्या अधिकाऱ्यांना एक दोन नव्हे तर कंपनीच्या राज्यातील सहा कार्यालयावर धाडी मारल्या. त्यामुळे रोहित पवार यांना परदेश दौरा सोडून मायदेशी परतावं लागलं आहे. मायदेशी येताच रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी काही सूचक विधानेही केली आहेत.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 6 जानेवारी 2024 : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या सहा कार्यालयावर एकाचवेळी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. तब्बल आठ ते नऊ तास ही छापेमारी सुरू होती. या छापेमारीत अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. रोहित पवार परदेशात असतानाच ही छापेमारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. छापेमारीची माहिती मिळाल्यानंतर रोहित पवार तातडीने कालच पुण्यात आले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे. तसेच या छापेमारी मागचं कनेक्शन थेट दिल्लीशी जोडलं आहे. तसेच एक धक्कादायक विधानही रोहित पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या सात दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं? भाजपचं कोण गेलं होतं? आणि अजितदादा मित्र मंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं? त्यावरून या छापेमारी मागच्या काही गोष्टी समजून येईल. या विषयावर आत्ताच मी अधिक बोलणार नाही, असं मोठं विधान रोहित पवार यांनी केलं आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग काही नाही. कारवाई सुरू आहे. आम्ही सर्व कागदपत्र दिली आहेत.
सत्तेत असलेले नेते मोठ्या आवाजात बोलत आहेत. मी चूक केली असती तर मी परदेशातून आलो नसतो. नाही तर अजितदादांबरोबर भाजपात जाऊन बसलो असतो. पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे. आमचा लढा सुरू आहे. ईडी असो किंवा कोणताही विभाग असो, आम्ही त्यांना मदत करत राहू, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
घोटाळा कधी झाला?
हे लोक ज्याला घोटाळा म्हणत आहेत. तो कधी झाला? बँकेवर प्रशासक कधी होते? प्रशासक असताना कोणत्या कंपन्या विकल्या गेल्या? राजकीय नेते तिथे होते. ज्यांच्यावर कारवाई सुरू होती, त्यांची यादी मागितली होती. त्या यादीत कुणाकुणाची नावे होती. ती माणसं त्याच पक्षात आहे की भाजपमध्ये गेले याचा अभ्यास करा. तुमच्या लक्षात येईल. हे सर्व असताना तुम्ही एकालाच का टार्गेट करताय हे सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला.