अजित पवार यांच्यानंतर रोहित पवार यांना भाजपचा धक्का, राम शिंदे यांनी मारली बाजी
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बाजार समिती निवडणुकीत भाजपने धक्का दिला होता. आता आमदार रोहित पवार यांना भाजपने नगर जिल्ह्यात धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे मत फोडून भाजपने विजय मिळवलाय.
कुणाल जयकर अहमदनगर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल नुकतेच जाहीर झाले होते. या निवडणुकीत धक्का बसलेल्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या पुण्यात अजित पवार यांना भाजपने धक्का दिला. अजित पवार यांचे २४ वर्षांपासून वर्चस्व राहिलेल्या बाजार समितीत हवेली बाजार समितीत भाजप पुरस्कृत पॅनल विजयी होते. आता नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला भाजपने धक्का दिला आहे. या ठिकाणी रोहित पवार यांना धक्का देत राम शिंदे यांचे पॅनल निवडून आले आहे.
काय आहे निकाल
कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवला गेला आहे. भाजप आमदार राम शिंदे गटाने या निवडणुकीत बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. सभापतीपदी भाजपचे काकासाहेब तापकीर तर उपसभापतीपदी भाजपच्या अभय पाटील यांचा विजय झालाय. भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
अशी झाली निवडणूक
संचालक पदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांना 9-9 अशा समसमान जागा निवडून आल्या होत्या. राम शिंदे यांच्या गटातील दोन उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. या मतमोजणीत कोणताही बदल झाला नाही. त्यानंतर रविवारी सभापती, उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सभापती पदासाठी भाजपच्या काकासाहेब तापकीर यांना 9 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या गुलाब तनपुरे यांना 8 मते मिळाली. राष्ट्रवादीचे एक मत बाद झाल्याने काकासाहेब तापकीर यांचा विजय झाला. तर उपसभापती पदासाठी भाजपच्या अभय पाटील यांना 10 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या अक्षय शेवाळे यांना 8 मते मिळाली. उपसभापती पदी भाजपच्या अभय पाटील यांचा विजय झाला.
एक मत फुटले
राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मत फुटले. यामुळे उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी झाला. राम शिंदे यांनी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजकीय खेळी करत रोहित पवार यांना धक्का दिला आहे.
हवेलीत अजित पवार यांना बसला होता धक्का
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपची एकहाती सत्ता आली. राष्ट्रवादी बंडखोर दिलीप काळभोर यांची सभापतीपदी निवड झाली. तर उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलला धक्का देत बाजार समितीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना हा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांच्या पॅनलचा पराभव झाला.