रुपाली ठोंबरे यांच्या सोशल मिडियावरील फोटोनंतर पुणे पोटनिवडणुकीत ट्विस्ट
रुपाली पाटील यांनी मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा फोटो टाकला. त्यावरुन विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदान गुप्त असताना रुपाली पाटील यांनी ते उघड केल्याचा आरोप केला आहे.
पुणे : पुणे कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil-Thombare) एका वादात आडकल्या आहेत. त्यांनी एक फोटो फेसबुक पेजवर टाकला आहे. त्या फोटोनंतर विरोधकांनी त्यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. परंतु हा आपला फोटो नाही, तो फोटो मला एक मतदाराने पाठवला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या वादामुळे आपण संध्याकाळी पाच वाजता मतदान करणार आहे, तोपर्यंत यंत्रणांनी शोध घ्यावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
काय आहे पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शुभ सकाळ. कसब्याचा नव्या पर्वाची, कामाची सुरवात. आपला माणूस, कामाचा माणूस. कसबा मतदारांचा… असा उल्लेख त्यात आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सोबत रवींद्र धंगेकर यांना मतदान (Voting) करतानाचा ईव्हीएम (EVM) मशीनचा फोटो अपलोड केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय म्हणतात विरोधक
रुपाली पाटील यांनी मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा फोटो टाकला. त्यावरुन विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदान गुप्त असताना रुपाली पाटील यांनी ते उघड केल्याचा आरोप केला आहे. त्यांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काय म्हणतात रुपाली पाटील
सोशल मिडियावरील फोटोच्या वादावर रुपाली पाटील यांनी आपली भूमिका टीव्ही ९ मराठीशी बोलताना मांडली. हा फोटो एका मतदाराने आपणास पाठवला. तो मी पेजवर टाकला. हा फोटो माझा नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. मी अजून मतदानच केले नाही तर माझा फोटो कसा येणार? मी संध्याकाळी पाच वाजता मतदान करणार आहे. तोपर्यंत यंत्रणेने शोध घ्यावा, असे त्यांनी म्हटलेय.
मतदानाला अल्प प्रतिसाद
कसब्यात अत्यंत धीम्यागतीने मतदान सुरू आहे. कसब्यात सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत अवघे 6.5 टक्के मतदान झालं आहे. मतदार दुपारपर्यंत बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर निवडणूक मैदानात उतरले आहेत. तर, हिंदू महासंघाचे आनंद दवेही मैदानात आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपला ही सीट राखण्याची आशा वाटत आहे.