Sadabhau Khot : तेव्हा काय गोट्या खेळत होता का? मराठ्यांना आरक्षण का नाही दिले?; सदाभाऊ खोत यांचा सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी काल काही राजकारण्यांची नावे घेऊन थेट टीका केली. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
सातारा | 15 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अंतरवली सराटीत मोठी सभा घेतली होती. या सभेला हजारो लोक उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची जोरदार मागणी केली. त्यांच्या या मागणीवरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट प्रस्थापित मराठ्यावरच हल्ला चढवला आहे. गेली 70 वर्ष प्रस्थापित मराठे सत्तेवर होते. तेव्हा का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तेव्हा काय हे लोक गांजा ओढत होते का? गोट्या खेळत होते का? असा संतप्त सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत हे मीडियाशी संवाद साधत होते. आताच मराठ्यांसह अनेक समाजाची आंदोलन कशी सुरु झाली? आरक्षणाचा मुद्दा आताच कसा निघाला? यापूर्वी हा विषय का निघाला नाही? गेल्या 70 वर्ष प्रस्तापित मराठा सत्तेवर होते त्यांनी काय केलं? सत्तेवर असलेले हे प्रस्थापित मराठे काय काय गांजा ओढत होते का? गोटया खेळत होते का? त्यांनी का आरक्षण दिले नाही? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.
फडणवीस यांच्या कोंडीचा डाव
तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी मराठा आरक्षणाचं हत्यार उपसलं गेलं आहे. फडणवीस यांची कोंडीकरण्यात येत असल्याचं आता लपून राहिलेलं नाही, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
आरक्षणाची फेरमांडणी करण्याची गरज
मराठा आरक्षण प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. पण आघाडी सरकारने योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण टिकले नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाणे, सर्वांना समान न्याय देणं गरजेचं आहे. संपूर्ण आरक्षणाचीच आता फेर मांडणी करावी लागणार आहे, असंही ते म्हणाले.
सरकार कमी पडतंय
आताच्या सरकारमध्ये नक्की कमांड कोणाची? कोणाला प्रश्न मांडायचा? सरकार आमचं असलं तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहाचायला कमी पडलं आहे, असा घरचा आहेरही त्यांनी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारला दिला आहे.
फडणवीस यांना दाबण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राच वाटोळं या प्रस्थापित घराण्यांनी केलं असून त्यांना उद्ध्वस्त केलं आहे. मराठ्यांना न्याय केवळ देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. राज्यात केवळ देवेंद्र फडणवीस हा एकमेव आश्वासक चेहरा आहे. बाकींच्यांनी रिंगण केलं आहे. आजच्या राजकारणातील घुसळण देवेंद्र फडणवीस या माणसाला दाबण्यासाठी सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.