जयंत पाटलांच्या मुलाची राजकारणात धडाक्यात एन्ट्री; पाहा आता कुठे उधळला गुलाल
प्रचंड मोठा हार प्रतीक पाटील यांना चक्क क्रेनच्या माध्यमातून घालण्यात आला. त्याच बरोबर हत्तीवरून साखर वाटप करत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी परिसतील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
शंकर देवकुळे, सांगली : राजरामबापू घराण्यातली ही तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील (jayant patil son pratik patil) यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला आहे. त्यांनी सहकारच्या माध्यमातून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केलाय. सांगली राजारामबापू साखर कारखान्याच्या संचालकपदी (rajarambapu sahakari sakhar karkhana ltd) ते निवडून आले होते. आता कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. आजोबांच्या पाठोपाठ नातू कारखान्याचा संचालक झालाय.
तिसरी पिढी आता राजकारणात
राजरामबापू घराण्यातली ही तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची इस्लामपूरच्या राजारामबापू सहकार कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आजोबांच्या पाठोपाठ आता प्रतीक पाटील राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष बनले आहेत. त्यांच्या निवडीननंतर राजरामबापू कारखान्याच्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांकडून गुलालांची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
असे झाले स्वागत
प्रचंड मोठा हार प्रतीक पाटील यांना चक्क क्रेनच्या माध्यमातून घालण्यात आला. त्याच बरोबर हत्तीवरून साखर वाटप करत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी परिसतील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
काय म्हणतात प्रतीक पाटील
या निवडीनंतर प्रतीक पाटील म्हणाले, आपल्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे. कारखान्याचे सभासद, शेतकऱ्यांना अधिकच्या सुविधा देण्यासाठी प्राधान्य राहील. त्याचबरोबर साखर क्षेत्रातल्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्याही सोडवण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहील. आपल्या कामाच्या माध्यमातून एक सकारात्मक कार्य उभे करू,असा विश्वास राजारामबापू कारखान्याचे नूतन अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जयंत पाटील यांच्या पावलांवर पाऊल
प्रतीक पाटील यांनी जयंत पाटील यांच्या पावलांवर पाऊल टाकले आहे. जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यातून झाला होता. ते संचालक व अध्यक्ष झाले होते. तब्बल 10 वर्षे जयंत पाटील कारखान्याचे अध्यक्ष होते.
जयंत पाटील यांनी आपल्यानंतर मुलगा प्रतीक पाटील यांच्याकडे कारखान्याची सूत्र दिली. म्हणजेच प्रतीक पाटील याचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला. जयंत पाटील तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ काळ कारखान्याच्या संचालक मंडळात होते. जयंत पाटील यांनी आता मुलगा प्रतीक पाटील यांच्यासाठी मतदारसंघ सुरक्षित बनवणे, राज्य पातळीवर राजकारणमध्ये त्यांना सक्रीय करण्यासाठी काम सुरु केले आहे.