BREAKING | संजय राऊत थेट सीबीआय डायरेक्टरला पत्र पाठवणार, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी
संजय राऊत यांनी 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ते उद्या सीबीआयला पत्र पाठवणार आहेत. तसेच या प्रकरणी चौकशी करणार आहेत. राऊतांच्या या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
बारामती : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज बारामतीच्या (Baramati) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात (Bhima Patas Sugar Factory) तब्बल 550 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप केलाय. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतचे आरोप केलेले. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा तसेच आरोप केले आहेत. विशेष म्हणजे आता ते या प्रकरणी थेट सीबीआयकडे कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. त्यासाठी ते सीबीआयला पत्र पाठवार आहेत. त्यांनी खरंच याबाबत पत्र पाठवलं तर संबंधित प्रकरणावरुन पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
“भीमा पाटस कारखान्यावर मी लवकरच जाणार आहे. भीमा पाटस साखर कारखान्या संदर्भात सातत्याने आवाज उठवला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं. भ्रष्टाचार करणाऱ्यांना माझी अडचण होते. त्यामुळे आम्ही त्यांना काही प्रकरण देत आहोत. शेतकऱ्यांच्या लुटीची, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची त्याच्यावर तुम्ही का कारवाई करत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
“भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हे या राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचं अत्यंत घाणेरडे प्रकरण आहे. मला सहकार क्षेत्रातलं फारसं कळत नाही. मात्र मी जे काही वाचलं यामध्ये साधारणता साडे पाचशे कोटींचं मनी लॉन्ड्रिंग आहे. मी उद्या सकाळी सीबीआय डायरेक्टरला या संदर्भात पत्र देतोय. तुम्ही हा तपास केला पाहिजे. तुम्ही आमच्या मागे लागतात”, असं आपण पत्रात म्हणणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
“साडेपाचशे कोटींची मनी लॉन्ड्रिंग नसेल तर या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत? इतका मोठा कारखाना शंभर कोटीचा असतो का? राहुल कुल आम्हाला शिकवता का? तुम्ही हिशोब द्या. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले यावर 100 कोटी सोडून द्या, भ्रष्टाचार आहे की नाही ते सांगा, असं संजय राऊत म्हणाले. याकडे राजकीय आरोप म्हणून दुर्लक्ष केलं जातं आहे का?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत उपस्थित केला.
‘शिवसेनेच्या 11 आमदारांवर असलेले खटले थांबवले’
“हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने वॉरंट काढलेले आहेत. त्यांना शुद्ध करून आपल्याकडे घेऊन हे खटले थांबवले आहेत. शिवसेनेच्या 11 आमदारांवर असलेले खटले थांबवलेले आहेत. याला तुम्ही काय म्हणणार?”, असा सवाल राऊतांनी केला.
“मालेगावच्या गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या नावावर 178 कोटी रुपयांचे शेअर्स गोळा केले. कुठे आहे हा कारखाना ? त्यासंदर्भात देखील मी उद्या सीबीआयकडे तक्रार दाखल करणार आहे”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
यावेळी संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर दिलं. “कोण नवनीत राणा? आपण त्यांना ओळखता का? परत त्या निवडणुकीला उभे राहू द्या. मग त्यांना कळेल. आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर त्या निवडून गेलेल्या आहेत. माझ्या माहितीनुसार त्या आरोपी आहेत. जातीचं बनावट प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढली. आशा लोकांनी उद्धव ठाकरेंवर बोलावं एवढी त्यांची लायकी नाही”, अशी टीका त्यांनी केली.