‘…तर माझ्या वडिलांची हत्या झाली नसती’, पुण्यातल्या मोर्चात वैभवी देशमुखचा आक्रोश
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी पुण्यात मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी भावूक आवाहन करत न्यायाची मागणी केली.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध पक्षांचे लोकप्रतिनिधींसह संतोष देशमुख यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी मंचावर आक्रोश केला. “संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अन्याया विरोधात न्याय मिळवण्यासाठी सगळे एकत्र जमले आहेत. जसा वडिलांचा हात तिच्या लेकीच्या पाठीवर असतो, तसा तुमचा हात माझ्या पाठीवर राहूद्या”, असं आवाहन वैभवी देशमुख हिने केलं. “शिवरायांचे विचार आपण जपले असले तर हा अन्याय झाला नसता, वडिलांची हत्या झाली नसती”, असं वैभवी देशमुख म्हणाली.
“हाक दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने. ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, त्याप्रमाणे इतर कुणाची होऊ नये यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही प्रशासनाला विनंती आहे”, असं वैभवी देशमुख म्हणाले. तसेच “आपले वडील संतोष देशमुख यांच्यावर झालेला अत्याचार आम्ही विसरू शकत नाहीत”, असंही वैभवी देशमुख म्हणाली.
माझ्या भावाला न्याय द्या : धनंजय देशमूख
यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीदेखील भूमिका मांडली. “घटनाक्रम जो झाला आहे, जेवढे आरोपी अटक झाले आहेत त्या सगळ्या आरोपींवर 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्यात संघटीत गुन्हेगारीला कायमचा ताळेबंद करा. माझ्या भावाला न्याय द्या. संतोष देशमुख माझा आरसा होता. न्याय द्या. नाहीतर माझा भाऊ मला परत द्या. आरोपींचा सीडीआर काढा. आरोपी पुण्यात कोणाला भेटले याची यादी काढा. समाजाला न्याय द्या”, असं आवाहन धनंजय देशमुख यांनी केलं.
सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा
भाजप आमदार सुरेश धस यांनीदेखील यावेळी भूमिका मांडली. “माझा आवाज हळूहळू वाढतो. माझा टॉप गिअर पडत नाही. पुण्यातल्या आमदारांना रविवारची सुट्टी असते म्हणून इथे यायला सवड मिळाली नसेल. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत न्याय झाला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. संतोष देशमुख यांच्या बाबतीत ज्या मागण्या आम्ही केल्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत”, असं सुरेश धस म्हणाले.
“एसआयटीमध्ये वालू काकाचे चालू बाबा सामील आहेत. याबाबत मी स्वतः सीएम साहेबांशी बोललो आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहावं अशी विनंती केली आहे. बीडमध्ये संघटित टोळी निर्माण करण्याचं काम वालू बाबाने केली आणि त्याला त्याचा आकाचा आशीर्वाद होता. ज्यांनी या लेकरा बाळांचे छत्र हरवून घेतल आहे तो आका असो किंवा आकांपेक्षा मोठा त्यांना फाशी झालीच पाहिजे. यांच्याकडे बघून पंढरी शेठ फडके यांचं गाणं आठवतं, जेव्हां भेटेल मी गुन्ह्यात, मला अटक करा पुण्यात. यांचे सगळे आरोपी पुण्यात अटक झाले. वालुकाका अँड गॅंग गँग्स ऑफ परळी यांच्यामुळे पुण्याचं नाव खराब होईल”, अशी टीका सुसेश धस यांनी केली.
“यांचे जिथे जिथे पुण्यात फ्लॅट्स असतील पुण्यातला जनतेला विनंती करतो यांची प्रॉपर्टी दिसेल फक्त कळवा की वालू काका इथे आला शंभर अकाउंट सापडले आहेत. यांचे जे अकाउंट सापडले आहेत त्यांची ईडीकडून चौकशी करा. 25 वर्ष झाले आम्ही राजकारणात आहोत. पुण्यात एक फ्लॅट रडत पडत घेतला आहे. त्यांच्या मागे ईडी लागेल बिडी सुद्धा लागेल”, असं सुरेश धस म्हणाले.
“एप्रिल-मे महिन्यापासून संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हे रचत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे. अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत. अजित पवार यांच्यावर कारवाई करा. या घटनेचा छडा लावा. केस संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा. याला सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा घ्यायचा नसेल तर बिन खात्याचा मंत्री करा”, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
“लालबहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक अपघात झाला आणि राजीनामा दिला. आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनी देखील राजीनामा दिला होता. नेत्यांना हात जोडून पाया पडून विनंती यांचा राजीनामा घ्या. मंत्रिपदाचा हाव मला नाही. मंत्रीपद ओवाळून टाकू”, असं सुरेश धस म्हणाले.