कोणी तरी आहे तिथे… रात्रीच्या अंधारात शौचालयात असं काही दिसलं की… नेमकी भानगड काय?
साताऱ्यातील रविवार पेठेत एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवार पेठेतील महिलांच्या शौचालयात रात्रीच्या वेळी कुणी तरी महिलेचा पुतळा आणून ठेवला. या पुतळ्याला चादर गुंडाळली. त्यामुळे शौचालयात कुणी तरी बसल्याचा भास होत होता. हा भुताटकीचा प्रकार तर नाही ना, असंही काहींच्या मनात आलं. हा धक्कादायक प्रकार पाहून महिलांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
संतोष नलावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सातारा | 26 डिसेंबर 2023 : साताऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे महिला वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. सातारा शहरातल्या रविवार पेठेतील महिलांच्या शौचालयात रात्रीच्या सुमारास काही महिलांना चक्क विद्रुप चेहरा असणारी महिला दिसल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेकांची बोबडी वळली. या भागातील शौचालय काही वेळासाठी बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या शौचालयात बॅटरीच्या उजेडात येऊन पाहणी केली असता वेगळच सत्य बाहेर आलं. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रविवार पेठ परिसरात महिलांसाठी नगरपालिकेने सार्वजनिक शौचालय बांधलेले आहे. रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. शौचालयात विद्रुप चेहरा असलेली महिला दिसली. ही महिला चादरीत गुंडाळलेली होती. अचानक या विद्रुप महिलेचा चेहरा पाहून महिलांची एकच तारांबळ उडाली. मात्र या भागात रात्री उशिरा लाईट गेल्यामुळे कोणीतरी खोडसाळपणे या शौचालयाच्या आतील बाजूस कपड्याच्या दुकानात असणारा महिलेचा पुतळा ओढणी लावून ठेवला.
त्यामुळे रात्री शौचालयात जाणाऱ्या स्थानिक महिलांना हा पुतळा दिसला. त्यामुळे त्यांच्या काळजात धस्स झालं. अचानक विपरीत गोष्ट पाहिल्याने काहींची बोबडीच वळली. भयाण अंधारातील या दृश्याने अनेकांच्या तोंडचं पाणीच पळालं. याप्रकरणी नगरपालिकेने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.
काय आहे पुतळा?
शौचालयात वॉश बेसिनच्या बाजूलाच हा पुतळा ठेवला आहे. या पुतळ्याच्या अंगावर हिरवी चादर पांघरण्यात आली आहे. तसेच हा पुतळा बसवलेला आहे. आसपास पूर्ण अंधार आहे. बघातच क्षणी एखादी महिला दबा धरून बसली की काय असा भास होतो. महिला जेव्हा शौचालयात आल्या तेव्हा हा पुतळा पाहून घाबरल्या. आत कुणी तरी बसल्याने त्यांना धसका बसला. हा भुताटकीचा प्रकार तर नाही ना? असंही काहींना वाटलं.
रात्रीच महिलांनी परिसरातील लोकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर टॉर्चच्या प्रकाशात लोक शौचालयात घुसले. त्यांनी हा पुतळा पाहिला. तेव्हा हा कपड्याच्या दुकानातील पुतळा असल्याचं आढळून आलं. आत कोणी नसून पुतळा असल्याचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
महिला आयोगाकडून दखल
दरम्यान, या धक्कादायक घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. महिला आयोगाने या प्रकरणी चौकशी करून उत्तर सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचं कळतं. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्हीही तपासले जात आहेत. खोडसाळपणा करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे.