केवळ उणिवाच नव्हे तर वस्तुस्थिती दाखवणे हे सुद्धा माध्यमांचे काम; श्री श्री रविशंकर यांचे रोखठोक मत
मनाची स्पष्टता, हृदयात शुद्धता आणि जीवनात प्रामाणिकता असायला हवी. हेच ते तीन आदर्श आहेत. न्यायव्यवस्था आणि राज्यकर्त्यांसाठीही हेच आदर्श लागू पडतात, असं त्यांनी सांगितलं.
पुणे: समाजाला आरसा दाखवताना त्यांना प्रेरणा देण्याचं कामही केलं पाहिजे. केवळ उणिवाच नव्हे तर वस्तुस्थिती दाखवणे हे सुद्धा माध्यमांचे काम आहे, असं परखड मत अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे उपस्थित होते. यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री श्री रविशंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. .
श्री श्री रविशंकर यांनी यावेळी पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचा गौरव करण्यात आला. जाधव यांनी पत्रकारितेत आदर्श निर्माण केला. पत्रकारांनी काळानुरुप कसं बदललं पाहिजे. कसं वागलं पाहिजे आणि काळानुसार पुढे जाण्यासाठी काय काय केले पाहिजे याची जाणीव जाधव यांना आहे. त्यामुळेच ते पत्रकारितेत दीर्घकाळ राहू शकले, असे गौरवोद्गार श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं.
सामंजस्य ठेवा
माध्यमांवर सामंजस्य ठेवण्याची जबाबदारी आहे. लोकशाही अधिक मजबूत आणि सशक्त करायची असेल तर चांगल्या पत्रकारिकेची गरज आहे. त्यासाठी केवळ माध्यमांनी उणिवाच दाखवून चालणार नाही. तर वस्तुस्थितीही दाखवली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
समाजाला प्रेरणा द्या
समाजाला आरसा दाखवण्याचं काम माध्यमं करतात. ही चांगली गोष्ट आहे. परंतु समाजातील चांगल्या लोकांना शोधून त्यांचा सन्मान करणंही गरजेचं आहे. लोकांना आशेचा किरण दाखवला पाहिजे. समाजाला प्रेरणा देऊन त्यांना प्रगतीपथावर नेलं पाहिजे, असंही श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं.
तीन आदर्श महत्त्वाचे
यावेळी त्यांनी पत्रकारितेतील तीन आदर्शही सांगितले. मनाची स्पष्टता, हृदयात शुद्धता आणि जीवनात प्रामाणिकता असायला हवी. हेच ते तीन आदर्श आहेत. न्यायव्यवस्था आणि राज्यकर्त्यांसाठीही हेच आदर्श लागू पडतात, असं त्यांनी सांगितलं. तसेच नामवंतांचा सत्कार केल्याने आपला देखील सत्कार वाढतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.